परभणी/ प्रतिनिधी
सेलू येथील लाच प्रकरणाला नाट्यमय वळण लागले असून ज्या संभाषणाची फीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली त्या प्रकरणाने मोठी कलाटणी घेतली आहे. सेलू येथील सुरेश करवा यांचा अपघात झाला नसून सुपारी देऊन खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. या खुनाचा सूत्रधार राहुल कासट यास पोलिसांनी अटक केली असून या खुनात सहभागीदार असलेल्या अन्य चार आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की सेलू येथे सुरेश करवा याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची उलट-सुलट चर्चा सुरू झालेली होती. त्यातच सुरेश करवा याची पत्नी व राहुल कासट यांचे संभाषण समाज माध्यमावर व्हायरल झाले. सुरुवातीला हे प्रकरण अपघाताभोवतीच फिरत होते. मात्र पोलिसांनी अत्यंत बारकाईने या घटनेचा तपास केल्यानंतर सुरेश करवा याचा अपघात झाला नसून खून करण्यात आल्याचे उघड झाले.
या कटात जितेंद्र उर्फ भरतसिंग ठाकूर (वय 36, गायत्रीनगर सेलू) याला राहुल कासट याने सुरूवातीला सहभागी करून घेतले. सुरेश करवा ज्या रस्त्याने मोटरसायकलवर येणे- जाणे करतो त्याच्या मार्गावर पाळत ठेवून निर्जनस्थळी अपघात करून खून करावा असे निश्चित केले. त्यानुसार करवा याच्यावर पाळत ठेवून त्याचा खून करण्याचाही प्रयत्न करण्यात आला पण हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. जितू ठाकूर हा आरोपी खून करण्यात अयशस्वी होत असल्याने सूत्रधार राहुल कासट याने त्याच्याकडे काम करणारा हमाल विनोद भारत अंभोरे (वय30) विशाल सुरेश पाटोळे (वय 21) या दोघांना कटाची माहिती दिली. व रोख रकमेची सुपारी देऊन सुरेश करवा याचा खून करण्याच्या कटात सामील करून घेतले. राहुल कासट याच्या सांगण्यावरून विनोद अंभोरे याने चारचाकी वाहन खोटे बोलून भाड्याने घेतले त्यावर चालक म्हणून राजेभाऊ रुस्तुमराव खंडागळे (वय 28) याला रोख रक्कम देऊन कटात सामील करून घेतले.
रविवारी 2 मे 2021रोजी सूत्रधार कासट याने सर्व आरोपींना कट पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विनोद अंभोरे याने चालक आरोपी राजेभाऊ खंडागळे याच्यासह भाड्याने घेतलेली चारचाकी आहेर बोरगाव रोडवरील सातोना टी पॉइंटवर थांबून सुरेश करवा येण्याची वाट पाहिली. सायंकाळी सुरेश करवा हे त्यांचे शेतातून परत सेलू येथे घरी परतत असताना यातील मुख्य सूत्रधार आरोपी राहुल कासट याने दिलेल्या सूचनेनुसार आरोपी राजेभाऊ खंडागळे याने चारचाकी वाहनाने करवा यांच्या मोटरसायकलचा पाठलाग केला व आरोपी विनोद अंभोरे, विशाल पाटोळे यांनी मुख्य आरोपी राहुल कासटने पुरविलेल्या मोटरसायकलने सुरेश करवा याचा पाठलाग केला. करवा हे रवळगाव मार्गावरील पुलाजवळ आले असतानाच राजेभाऊ खंडागळे याने त्यांच्या मोटर सायकलला धडक देऊन खाली पाडले व तो पळून गेला. त्याचवेळी पाठीमागे मोटरसायकलवर असलेल्या विनोद अंभोरे व विशाल पाटोळे यांनी त्यांची मोटरसायकल थांबून करवा यांना काही कळण्याच्या आतच या दोघांनी दगडाने व लोखंडी सबलने डोक्यात वार करून ठार मारले. तेथून हे आरोपी परत सेलूला आले व मुख्य सूत्रधार कासट यांच्याकडून पैसे घेऊन प्रकरण शांत होईपर्यंत जालना येथे पळून गेले. मुख्य सूत्रधार असलेल्या कासट यानेही अपघाताचा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात या सर्व बाबी उघड झाल्या. त्यातून आरोपी राहुल भिकुलाल कासट यास हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व इतर तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त एस. यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या पथकाने मिळून ही कारवाई केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें