आमदार बाबाजानी दुर्राणी बोर्डीकर गटाच्या तंबूूत; वरपूडकर गटास धक्का... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 मार्च 2021

आमदार बाबाजानी दुर्राणी बोर्डीकर गटाच्या तंबूूत; वरपूडकर गटास धक्का...

 


जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकः युध्द पातळीवर प्रचार सुरू

संतोष धारासूरकर.

परभणी, दि.14/03/2021.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या तंबूत दाखल होवून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार दुर्राणी यांनी ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्या बरोबर सलोखा केला होता. विशेषतः उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजे 10 मार्च पर्यंत ते वरपूडकर यांच्या गटासोबत होते. त्यामुळेच ते वरपूडकर विरूध्द बोर्डीकर यांच्यातील तुल्यबळ लढाईत वरपूडकर यांच्या पॅनलच्या समर्थनात प्रचार यंत्रणेत सहभागी होते असे अपेक्षीत होते. परंतू दुर्राणी यांनी दहा मार्च पासूनच नाराजीची सूर आळवून वरपुडकर यांच्या गटापासून स्वतः दूर केले.  त्या दरम्यानच ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांनी पाथरी गाठून दुर्राणी बरोबर गुंप्तगु केले. या दोघा मातब्बर ज्येष्ठ नेत्यातील भेटीची खबर कळाल्या बरोबर वेळी ज्येष्ठ नेते वरपूडकर यांनी दुर्राणी यांच्याशी संपर्क साधला. माजी आमदार सुरेश देशमुख यांनी खाँ साहेबाच्या नाराजीचा सूर कळाल्या बरोबर पाथरीस धाव घेतली. दुर्राणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतू देशमुख हे माघारी परते पर्यंत दुर्राणी यांनी बोर्डीकर गटाच्या तंबूत दाखल होवून प्रचार युध्दात सुध्दा उडी मारली. 

आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या समवेत दुर्राणी यांनी शनिवारी व रविवारी काही तालुकास्थानाचा दौरा केला व मतदाराच्या गाठीभेटीही सुरू केल्या. दुर्राणी यांच्या या कृतीने वरपूडकर गटात निश्‍चीतच धक्का बसला आहे. दुर्राणी यांच्या नाराजीचे अधिकृत कारण कळाले नाही. वरपूडकर यांच्यावरीलच तीव्र नाराजी तसेच अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांना दिलेल्या उमेदवारीचे कारण पुढे करीत दुर्राणी यांनी बोर्डीकर यांच्या बरोबर सलोखा केला. असे सकृतदर्शनी चित्र आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदीही डोळ्यासमोर ठेवून दुर्राणी यांनी बोर्डीकर गटाबरोबर सलोखा केला असावा, असाही की कयास राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सतिश चव्हाण यांच्या मार्फत खाँ साहेबांना वरपूडकर गटाबरोबरच राहण्याचे सूचना केल्यानंतर सुध्दा दुर्राणी यांनी हे पाऊल उचलल्या बद्दल राजकीय क्षेत्रात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर व माजी आमदार देशमुख या दोघांनीही दुर्राणी अशी पाऊले उचलू नयेत, असा सल्ला दिला होता. तरी सुध्दा दुर्राणी हे बोर्डीकर गटाच्या तंबूत दाखल झाले आहेत. 

 जिल्हा बँकेच्या ऐन रणधुमाळीत दुर्राणी यांच्या या भूमिकेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ नेते वरपूडकर यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मोट बांधली असतांना दुर्राणी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांची सलगी केल्याबद्दलही वरपूडकर गटातून अस्वस्थता व्यक्त होत आहे. 

दरम्यान, दुर्राणी यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रविवारी रात्री ते उपलब्ध झाले नाहीत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें