कवी गोविंद रोकडे यांनी आपल्या नवसाहित्यातून जिंकली चिमुकल्या विद्यार्थ्यांची मनं.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथे आज 'लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राम मैफळ तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गोविंद रोकडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेची मुख्यमंत्री कु .रेश्मा आडे हिने व्यक्त केले. तर शाळेत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी ची माहिती युवराज माने यांनी दिली.
*'लेखक आपल्या भेटीला'या उपक्रमाचे 9वे पुष्प विणताना कवी गोविंद रोकडे यांनी 'बालपण' या कवितेद्वारे सुरुवात करून मुलांची मनं जिंकली.*
“मी कालचा सूर्य बुडालोच आहे,
फिरून माथ्यावर पुन्हा आलोच आहे।
धावताना थकल्या वाटास आराम का?
धावते वादळ घेऊन मी चाललोच चाहे.....”
आशा वेगवेगळ्या खुमासदार कविताद्वारे मुलांना सद्य परिस्थितीवर त्यांनी चिकित्सकपणे पहा असा सल्लाही दिला. मावळता सूर्य, काठावर रडणारा, आस डोळ्यांची, बालपण ,नाही शिट्टी नाही सुट्टी अशा वेगवेगळ्या कविता मुलांना गायन करून त्या कवितांचा भावार्थ व कविता कशा सुचल्या याविषयी सविस्तर संवादही त्यांनी मुलांशी साधला. निसर्गाच्या सद्यस्थितीचा वर्णन करताना त्यांनी आस डोळ्यांची ही कविता सादर केली.
आस डोळ्यांची सरणा
पाणी आभाळ भर णा
ओलावती पापणीला ,
तरी दुष्काळ जाईना
चार कणसाची झाड
,मोड वाडे माती आड,
दैव कस बाई द्वाड
चार थेंबबी पडना......
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणातील कसा फरक पडतोय याविषयी ही मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामीण भागातील रांजण, काठवट ,चूल ,जातं,उखळ,-मुसळ ,डेरा सूरपारंब्या ,सूरपाट्या हीचकोंडी ,रानमेवा, चाळ पायवाट, डोह असे कितीतरी ग्रामीण भागातील शब्दांविषयी त्यांनी मुलांना अवगत करून दिलं शहरी भागातील मुलांना या शब्दांपासून फार दूर राहावं लागतं असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागाचे वर्णन करताना त्यांनी,
कधी वाटते जावे फिरूनी, आज पुन्हा त्या ओढ्याकाठी!
जिथे लटकत पारंब्याना झुलत टळली दुपार कोवळी!
रानफुलांच्या रंगात भिजलो, तुरे होऊनी गवताची
नाचत गेलो धावत गेलो, धून झऱ्यांची निवांत ऐकत!
ही सुंदर अशी कविता सादर केली. त्यांच्या सर्वच कविता निसर्गावर आधारित होत्या. शेतकऱ्यांचे वर्णन करताना ते कवितेमधून म्हणतात,
शेतामधी एक मळा, मळ्यावर साळ
त्यावर उड्या मारी, कुणब्याचा बाळ
पिक पाहून लाखाचं, कुणब्याची भर छाती
साऱ्या जगाला जगवी, अशी मायाळू ग माती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवी गोविंद रोकडे यांना त्यांच्या साहित्य विषयावर वेगवेगळे प्रश्न विचारले बालपणापासून ते लेखन कागदावर उतरवण्यापर्यतच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील प्रश्नांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
मी वेचले मोती येथून
ही पदराची दौलत नाही,
उधारीची झालं माथी
लावून उगा मी मिरवत नाही
जे उठले मनात वादळ
तेच मांडले मी पानावर
शब्दात त्यांना मी गुंफले
घाव झाले जे हृदयावर.......
अशा वेगवेगळ्या गंभीर कविताही याप्रसंगी त्यांनी सादर केल्या परभणीचे भूमिपुत्र असलेले इंद्रजीत भालेराव यांची "गावाकडे चल माझ्या दोस्ता" विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून त्यांनी ही कविता गायन करून दाखवली याप्रसंगी शाळेत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा त्यांनी केलं.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील चिमुकल्या मुलांनी कवी गोविंद रोकडे यांचं, वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें