योगेश मोरे (औरंगाबाद
प्रतिनिधी)
दि.09.04.2019
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची उमेदवारी ही चंद्रकांत खैरे यांची चाल असून मतदान जवळ आल्यानंतर मतदारांना भगवा पाहिजे की हिरवा असे भावनिक आवाहन करून पुन्हा खैरे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणार असल्याने त्यांच्यापासून सावध राहा केलेली विकास कामे व उमेदवाराची क्षमता पाहून मतदान करा असे आवाहन शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवधन जाधव यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत बोलताना केले.
गंगापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भर उन्हामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मतदारांनी या निवडणुकीकडे विकासाच्यादृष्टीने पाहावे. कन्नडमध्ये मी केलेली रस्ते, शेतकऱ्यांना पिककर्ज, बेरोजगारांना दिलेला रोजगार यांची व माझ्या प्रतिस्पध्रर्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे यांची तुलना करून जनतेची कामे करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला मतदान करावे.
माझे काँग्रेसचे तिकिट फायनल झाले होते मात्र चंद्रकांत खैरे यांनी माझ्यासारखा प्रबळ प्रतिस्पर्ध्याची धास्ती घेउन त्यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी असलेल्या राजकीय कनेक्शनचा वापर करून माझे तिकिट कापल्याचा आरोप हर्षवधन जाधव यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, नेहमीप्रमाणे खैरे पुढील काही दिवसांत भगवा पाहिजे की हिरवा असे भावनीक आवाहन करून पुन्हा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणार असल्यानु त्यापासून सावध राहून शिवस्वराज्य पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश धामोरीकर यांनी गंगापूर तालुक्यातील गंगापूर साखर कारखान्यासह तालुक्यातील बेरोजगारांना कर्ज वाटपात होणारी अडवणूक,शेतकरी युवक आत्महत्या,महसुल व्यवस्था, आरोग्य,शैक्षणिक बाबीसह
प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याने सामान्यांची होणारी हेळसांड,शेतकरांचा वीज,पाणी,चारा या समस्या थांबवण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांच्या पाठिमागे उभे राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अमोल सवाई, अतिफ पटेल, नितीन जाधव यांची भाषणे झाली सुत्रसंचालन संकेत मैराळ यांनी तर आभार सचिन शिंदे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें