मतदानाच्या पवित्र राष्ट्रकार्यात सहभागी व्हा : माणिक महाराज मांगुळकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 अप्रैल 2019

मतदानाच्या पवित्र राष्ट्रकार्यात सहभागी व्हा : माणिक महाराज मांगुळकर.

श्री कालिंका देवी वार्षिक यात्रौत्सव उत्साहात, मतदानाचाही घातला जागर.


सेलू प्रतिनिधी


सेलू  : सध्या देशभर निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, यांची तमा न बाळगता मतदानाच्या पवित्र राष्ट्रकार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, गावोगावी गावी मतदानाचा जागर घालून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन दहेगाव ( ता.जिंतूर ) येथील माणिक महाराज मांगुळकर यांनी केले आहे.
सेलू येथून जवळच असलेल्या हेलस येथील श्री कालिंका देवीच्या ३६ व्या वार्षिक यात्रौत्सवात सोमवारी कीर्तन सेवा देतांना ते बोलत होते.
" अनादि अंबिका भगवती
बोध परडी घेऊन हाती
... " हा संत एकनाथ महाराजांचा अभंग त्यांनी निरूपणासाठी घेतला होता. तत्पूर्वी बोलतांना मांगुळकर यांनी मतदान जनजागृतीपर ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
साधू संतांनी, महापुरुषांनी अनेक ग्रंथातून लोककल्याणाचा उपदेश केला.  त्या प्रमाणेच देशातील लोकशाही सुदृढ व्हावी यासाठीचा भारताचे संविधान हाही एक पवित्र असा लोककल्याणकारी ग्रंथ आहे. सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही अमिषाला बळी पडण्याचे, व्यसनाला भूलण्याचे पाप करून पवित्र राष्ट्रकार्याचा अपमान करू नका, सद्सद् विचार पूर्वक मतदान करा, असे आवाहन श्री मांगुळकर यांनी केले.

ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवरील प्रवचनात
मंगळवारी (ता.९) देविदास महाराज ढोके म्हणाले,
" या नरदेहातच मोक्ष  प्राप्ती आहे. भय, दु:ख, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी भगवती देवीचे, भगवंताचे चिंतन, नामस्मरणशिवाय पर्याय नाही "  रात्री हरहर महादेव वारकरी संस्थेचे संदीप महाराज यांचे कीर्तन झाले.
दरम्यान, सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाची कुलदेवी श्री कालिंका मातेच्या राज्यभरातील मंदिरांपैकी हेलस येथील हेमाडपंथी मंदिर अत्यंत प्राचीन आहे. हे ऐतिहासिक संदर्भातून स्पष्ट होते. त्यामुळे या स्थळाच्या विकासासाठी प्रत्येकाने पुढे येणे , मंदिराची प्राचीन वास्तू व वारसा जतन करणे गरजेचे आहे,
असे प्रतिपादन परभणी येथील जेष्ठ कार्यकर्ते विलासराव वानरे गुरुजी यांनी केले. त्यानंतर मंदिराच्या विकासकामासाठी उपस्थित समाज बांधवांनी भरूभरून प्रतिसाद दिला.
सामाजिक बांधिलकीची जपणूक,मराठवाड्यासह विदर्भातील अनेक भाविकांनी व अन्य समाज बांधवांनी अन्नदान सेवेत सहभाग घेतला. बुधवारी (ता.१०) सामाजिक बांधिलकी जपत संस्थानतर्फे एका सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे पदाधिकारी सतीश तळणीकर, बालासाहेब दहिभाते, बाबासाहेब हेलसकर, सुभाष दहिभाते, महिला व युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.यात्रौत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें