शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०१९ ते रविवार दिनांक १४ एप्रिल २०१९ याकाळात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने दिनांक १३ एप्रिल या उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे. तसेच याकालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेंव्हापासून प्रतीवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने शुक्रवार १२ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वा. व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, दुपारी १२.३० वा. माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४.०० वा. ते सायं.६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ६.३० वा.धुपारती होणार असून रात्रौ ९.१५ वा. चावडीत श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.
शनिवार, दिनांक १३ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. पहाटे ५.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्नान होईल. सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक १३ एप्रिल रोजीची नित्याची शेजारती व दिनांक १४ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. उत्सवाच्या सांगता दिनी रविवार, दिनांक १४ एप्रिल रोजी पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.३० वा. गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक, सकाळी १०.३० वा. गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायं.६.३० वा. धुपारती होवून रात्रौ १०.३० वा. श्रींची शेजारती होईल.
उत्सव कालावधीमध्ये रोज सायं. ७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाचे निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्चरिताच्या अखंड पारायणामध्ये जे साईभक्त भाग घेवू इच्छीतात अशा साईभक्तांनी आपली नावे गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १.०० वा. ते सायंकाळी ५.३०वा. यावेळेत समाधी मंदिरातील व्यासपीठावर नोंदवावीत. त्याच दिवशी सोडत पध्दतीने पारायणसाठी भक्तांची नावे सायंकाळी ५.३५ वा. निश्चित करण्यात येतील. तसेच दिनांक १३ एप्रिल या उत्सवाच्या मुख्य दिवशी होणारे कलाकारांचे हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकरांनी आपली नावे त्याच दिवशी समाधी मंदिराशेजारील अनाऊन्समेंट सेंटरमध्ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत असे सांगून सर्व साईभक्तांनी या उत्सवास उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन ही श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें