निरासक्त मानिनी " पोलिस उपअधीक्षक रेणुका वागळे.." - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 जनवरी 2019

निरासक्त मानिनी " पोलिस उपअधीक्षक रेणुका वागळे.."

आयुष्याने अनेक खडतर प्रसंग घेऊन सामोरं येत रहावं तरीही स्वतःची धडपड अविरत चालूच ठेवावी,ह्रदयाला तारतार  करणारं दुःख दैवाने वाट्याला द्यावं त्यालाही मनाच्या कोपर्‍यात बंद ठेवून चालत राहाव... समाजाने उपहास करावा आणि  आपल्या जिद्दीने, संघर्षांने त्याला निरुत्तर करत ध्येयाच्या अत्त्युच्च बिंदूला गाठावं...!
  सामान्यांप्रमाणे राहत असामान्य कर्तृत्व दाखवणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून सेलू(जि.परभणी)  पोलीस उपअधीक्षक पदावर उत्कृष्ट कामगिरी करुन सर्वांच्या मनात जागा मिळवणा-या रेणुका वागळे यांची कहाणी आहे.
दिलखुलास व्यक्तीत्व आणि रेखीव चेहऱ्याची देणगी लाभलेल्या रेणुका मॅडमच्या स्वभावाने मला त्यांच्या सहवासाची नेहमीच ओढ राहीली आहे आणि योगायोगाने आमच्या भेटीही वारंवार होत असतात.गेल्या काही महिन्यात जणू अनेक वर्षाची ओळख असल्यासारखा संवाद हे त्यांच्या मनमिळावूपणाचं लक्षण! आद्य शिक्षिका  सावित्रीबाई फुले ह्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास जाण्यासाठी आम्ही सोबत निघालो.स्री सुलभ स्वभावाप्रमाणे सहजच  घरगुती गप्पा निघाल्या.मी मोठ्या औत्सुक्याने त्यांच्या  जीवनाबद्दल विचारलं आणि सहज पण कुठेतरी सल असल्याची जाणीव त्यांच्या स्वरात दिसली.भारावलेल्या शब्दात त्यांनी  थोडक्यात आपल्या प्रगतीची गाथा आणि त्यासमवेतची व्यथा कथन केली.कुटूंबाची साथ प्रगतीच्या कुठल्याही वाटा रोखून शकत नाही हे मात्र त्रिकाल अबाधित सत्य आहे असं म्हणत असताना आपले वडील, आजी आणि पती यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सासरी माहेरच्या शिंपल्यात घडलेल्या ह्या मौक्तिकाने जीवनाची अनेक वळणं चढउतार पाहिलेत.
  वागळे कुटूंबात 68 वर्षानंतर कन्यारत्न म्हणून रेणुकाजींनी प्रवेश केला. 10×12 च्या रुममध्ये वडील व काकांसह कुटूंबियाचा निवास होता.पाठची बहीण जन्मली आणि घरमालकाने कुटूंबास  घरात ठेवण्यास नकार दिला.प्रतिकुल परिस्थितीत वाशी,पनवेल (मुंबई ) येथे जि. प.शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले.वयाच्या 12 व्या वर्षी मातेचं छत्र हरवलं.आईविना पोरक्या असलेल्या रेणुका वागळे यांनी तशा परिस्थितीतही 10 वीत 84 टक्के व 12 वीत 89टक्के गुण घेतले.केवळ एक टक्क्याच्या अभावाने MBBS च स्वप्न हवेत विरलं. आजारी आजी,शिक्षण घेणारी बहीण आणि त्यावर  वडिलांचा अपरा पगार ..प्रायव्हेटने नंबर लावणं शक्य नव्हत. आपल्या व्यक्तिगत जीवनाला तिलांजली देत पुनर्विवाहाचा निर्णय टाळून मुलीच्या ध्येयासाठी लढणाऱ्या पित्याने रेणुकाजींना B.Sc.ला प्रवेश दिला. आणि इथूनच लोकांचे टोमणे सुरू झाले.हुशार मुलगी आणि B.Sc?आणि एवढा अभ्यास कसला करते?असं तोंडावर बोलणं सुरु झालं.अशावेळीच माणसाचा खरोखरी कस लागतो कुठल्याही वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करत रेणुकाजींनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच सारस्वत को. ऑप.  बँकेच्या लिपिक पदावर नौकरी सुरू केली  .परीक्षा देणं चालूच होत आणि यशाचा घास मुखापर्यंत येता येता परतत होता.त्यांचा निश्चय अढळ होता स्वतःला प्रशासकीय सेवेतच पाहण्याचं त्यांच स्वप्न  होतं. दरम्यान 2007 साली त्यांचा विवाह विशाल बागडे यांच्याशी झाला. आपल्या पत्नीच्या  आकांक्षाना ह्रदयाला लावणा-या पतीने रेणुका यांना योग्य ती साथ दिली आणि 2009साली त्या विक्रीकर खात्यात विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्त झाल्या.1 वर्गीय प्रशासकीय अधिकारी बनण्याचं त्यांच ध्येय अजून पूर्ण झालं नव्हत.हे करत असताना समाजाची कटू बोलणी चालूच होती.पुत्ररत्न प्राप्त झालं होतं आणि त्याचबरोबर जबाबदारी वाढली होती.
2012 साली उजाडलं!राज्यसेवा परीक्षेची जाहीरात आली.आता नाही तर कधीच नाही. ..वय वर्षे 32पूर्ण होणार. .Age bar  होण्याची भिती होती. घरची कामे, लोकलचा प्रवास,बाळाची काळजी आणि 12 तासांची नौकरी त्याचबरोबर यश अपयश ह्याबद्दल घालमेल या सर्व गोष्टींच आव्हान पेलत प्रचंड ताकदीने रेणुकाजींनी परीक्षा दिली आणि विद्यार्थीनींतून प्रथम येण्याचा सन्मान मिळविला.काय अद्वितीय आनंद असेल तो?
DYSP च्या बॅचमध्ये एकमेव महिला, सद्गुणी मुलगी आणि परिपूर्ण पत्नीने हे यश खेचून आणल होतं.त्यानंतर DYSP चे खडतर प्रशिक्षण, जिल्हा प्रशिक्षण, जिल्हाबाह्य प्रशिक्षण अशी  कठीण प्रशिक्षण यशस्वी रित्या  पूर्ण करुन रेणुकाजी नियमित उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेलूस कार्यरत झाल्या.
 अनुकूल ,सर्व सुविधायुक्त  जगणं त्यात लाडाकोडाची साथ असणं हे सामान्यपणे ब-यापैकी  विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतं पण खरा 'माणिक 'घडतो जो यापासून दूर असूनही ध्येयवेडा  असतो.एकाएकी यश मिळणं खरच खुप कठीण..आपल्या महत्वाकांक्षेने आणि स्वकष्टाने यश
मिळवणारी माणसे अभावाने सापडतात.त्यात पाय खेचणारे आणि कडवट बोलणा-यांवर मात्र करणं हेही जिकीरीचंच!
उच्च पदावर पोचलं की मात्र झुगारणारेच नाती सांगतात!हाही अनुभव रेणुकाजींनी घेतलाय.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा सत्कर्मी महाराष्ट्र कन्येबद्दल लिहण्याची मनोमन इच्छा झाली.
रेणुकाजींच व्यक्तीत्व निर्व्याज, प्रेमळ, सर्वात मिळूनमिसळून राहणारं आहे. ह्या पदावर पोचून सुद्धा  अहंकाराचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नाही. संगीत, कला,वक्तृत्व ह्या सर्व क्षेत्रात प्रभुत्व असणा-या रेणुका वागळे मॅडम महिलांना हात आणि अडचणीत साथ देणाऱ्या, उद्बोधन करणा-या लोकप्रिय पोलीस अधिकारी ठरल्या आहेत.
 त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांना  भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. .!!!
लेख=सौ.जयश्री विवेक सोन्नेकर. के .बा .विद्यालय सेलू .जि .परभणी
सौजन्य=तेज़्ज़न्युज़ 24 वेब चैनल.
चालुघडामोडि,बातम्या व लेखसाठि संपर्क.
संपादक मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें