सेलू प्रतिनिधी
सेलू :- पारंपरिक बाजारपेठेत मोठे बदल होत आहेत. ग्राहक प्रत्यक्ष बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन खरेदी करत आहेत. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र यामध्ये फसवणूकीचे प्रमाण वाढत असल्याने ऑनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगा असे आवाहन ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांनी सेलू येथील महिला मेळाव्यात केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व नगर पालिका वस्ती स्तरावरील सर्व बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 12 जानेवारी रोजी विद्यानगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर नगरसेविका कमल झमकडे, नगरसेविका विश्रांती जाधव, नगरसेविका शोभा कोरडे, ग्राहक पंचायतच्या अश्विनी घोगरे, नगर पालिकेचे समृद्धी प्रकल्प अधिकारी हनुमंत बिडवे, नितीन कोरडे, योग शिक्षिका शिल्पा पिंपळे, सुनील जाधव, शेख जुलेखा आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पुढे बोलताना डाॅ. मोरे म्हणाले की बाजारात सध्या खरेदीला जाणे मोठी कटकट बनली आहे. गर्दीतून प्रवास करून पोहोचल्यानंतर रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांमधून वाट काढताना अनेकांचा जीव मेटाकुटीला येतो. खरेदीनंतर पुन्हा प्रवास करण्याचा मूड जातो. त्यामुळे ग्राहकांचा ओढा दुकानात जाण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंगकडे वळू लागला आहे. ब्रॅँडेड माल मिळत असल्याने आणि पैसे देण्याचे विविध पर्याय असल्याने घरबसल्या खरेदीचा प्रकार लोकप्रिय होत आहे. याचाच फायदा घेऊन ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डाॅ. मोरे म्हणाले. यावेळी नगर पालिकेचे प्रकल्प अधिकारी हनुमंत बिडवे यांनी शासनाच्या रोजगाराच्या संधी व विविध योजनांची माहिती महिलांना सांगितली. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें