सेलू(प्रतिनिधी)
सध्या तरुण पिढी व्यसनात अडकत आहे.परंतु व्यसनांच्या आहारी जाऊन चांगले शरीर खराब करण्यापेक्षा व्यसनांपासून दूर राहून उज्वल पिढी घडवा,असे प्रतिपादन न्यायाधीश भा.भा.शेळके यांनी केले.
येथील श्री.केशवराज बाबासाहेब विद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह व दिव्यांग दिनानिमित्त तालुका विधी समिती,तालुका वकील संघ व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश भा.भा.शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे,संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.एल.एम.सुभेदार,वकील संघाचे अध्यक्ष ऍड.एल.एच.खोना,मुख्याध्यापक के.ए.ढोले,ऍड.सोनकांबळे,सरकारी अभियोक्ता अनिता धुळे आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना न्यायाधीश भा.भा.शेळके म्हणाले की,समाजाच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे.महाविद्यालयीन जीवनात व्यसन लागू शकते.परंतु याच वयात तरुणांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.वाचन संस्कृती वाढवल्याने चिंतन व मनन क्षमतेत वाढ होते आणि व्यक्तिमत्व प्रगल्भ होते.
एड्स या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.हरबडे म्हणाले की,वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे.एड्सग्रस्त व्यक्तींना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.धूम्रपान,मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.एड्स होण्याची कारणे सांगून तरुण पिढीने संयम बाळगणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दिव्यांग दिनानिमित्त ऍड.हर्षवर्धन सोनकांबळे म्हणाले की,समाजात जे दिव्यांग आहेत त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.दिव्यांग व्यक्तीबद्दल भेदभावाची वागणूक न देता त्यांना सन्मानाने वागणूक देणे आवश्यक आहे.तसेच दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सुविधांबद्दल त्यांनी माहिती दिली.यावेळी दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक देण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ऍड.एल.एच.खोना यांनी केले.सूत्रसंचालन सिद्धार्थ एडके यांनी केले तर आभार नरेश पाटील यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें