प्रतिनिधी.औरंगाबाद.
मुस्लिम आणि दलित मतांच्या जोरावर आतापर्यंत राज्यात सर्वाधिक काळ सत्ता भोगणारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यातील वंचित बहुजन, एमआयएम आघाडीच्या कालच्या सभेने बिथरली आहे. पण आम्ही अजिबात घाबरलो नाही असा आव हे दोन्ही पक्ष आणत असल्याचा आरोप एमआयएमचे महाराष्ट्रातील नेते व औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार इम्तियाज जलील यांनी बोलतांना केला.
वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांची औरंगाबादेत 2 ऑक्टोबर रोजी संयुक्त रेकॉर्डब्रेक सभा झाली होती. त्यानंतर पावणे दोन महिन्यांनी पुण्याच्या सर्वात मोठ्या मैदानावर पुन्हा वंचित बहुजन आघाडीची सभा झाली. ओवेसी यांच्या अनुपस्थितीत इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद प्रमाणेच इथेही टाळ्या मिळवणारे भाषण केले.
कॉंग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक असलेल्या प्रकाश आंबेडकरांना गेल्या दीड महिन्यात कॉंग्रेसकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बारा जागा देण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला होता. मात्र त्यावर कॉंग्रेसने चकार शब्दही काढलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यात आमची आघाडी होणार असे संकेत देत 40-42 लोकसभेच्या जांगावर एकमत झाल्याचे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांना विचारले असता ते म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुस्लिम आणि दलित समाजाची ताकद काय आहे हे कळून चुकले आहे. आम्ही किती महत्वाचे आहोत हे त्यांना माहित आहे, पण आम्ही तुम्हाल महत्वच देत नाही असे भासवण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. भाजपची बी टीम असा आमच्यावर नेहमीच आरोप केला जातो. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडून देण्याचा ठेका दलित आणि मुस्लिम समाजाने घेतला आहे का ? तुमच्या लेखी आमची काहीच किंमत नसेल तर येत्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. याआधी हे दोन्ही पक्ष सत्तेवर होते ते केवळ आमच्यामुळेच हे त्यांनी ध्यानात ठेवावे असा सूचक इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी वेगळे राजकीय समीकरण उदयास आणून भल्याभल्यांची जोप उडवली आहे. पुण्यातल्या सभेनंतर त्यांना झोपच लागणार नाही. अब की बार आंबेडकर सरकार हा वंचित बहुजन आघाडी ने दिलेला नारा लोकांना भावला आहे. सहा तास एकाच ठिकाणी बसून नेत्यांची भाषण ऐकणे सोपी गोष्ट नाही, सोशल मिडियावर देखील कालच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करणारे पुन्हा आमच्या मागे धावायला लागले तर नवल वाटायला नको असा दावा करतांनाच पुुण्यातील भव्य जाहीर सभेनंतर नागपूर आणि त्यानंतर समारोपाची सभा मुंबईत घेण्याचे नियोजन असल्याचे देखील इम्तियाज यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें