औरंगाबाद : "ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन' अर्थात एमआयएम आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 12 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे कळते. सध्या लोकसभेत एमआयएमचा एकमेव खासदार म्हणजे असदोद्दीन ओवेसी यांच्या रुपाने प्रतिनिधित्व करत आहे. परंतु राज्यात पक्षाचा झालेला विस्तार आणि वाढती ताकद पाहता बारा लोकसभा मतदारसंघात एमआयएम आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम वोट बॅंकेवर डोळा ठेवून असलेल्या इतर राजकीय पक्षांचे मात्र बारा वाजणार अशीच शक्यता आहे.
हैदराबादमधून देशाच्या राजकारणात प्रवेश करणाऱ्या एमआयएमने अल्पावधीत महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत एमआयमचे वारीस पठाण भायखाळा तर इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणूकीत 24 नगरसेवक निवडून आणत एमआयएमने आपली ताकद दाखवून दिली होती.
याशिवाय गेल्या वर्षभरात झालेल्या जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएमचे 112 सदस्य निवडून आले. स्वांतत्र्य काळापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे असलेल्या मुस्लिम वोट बॅंकेला सुरुंग लावण्याचे काम राज्यात एमआयएमने केले. त्यामुळे एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून देखील हिणवले जाते. मात्र याकडे फारसे लक्ष न देता येत्या लोकसभा निवडणुकीत 12 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची जोरदार तयारी एमआयएमच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची चर्चा आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें