सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०९सप्टेंबर २०१८.
पशुधन म्हणजे कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा जीव की प्राण. प्रत्येक शेतकरी आपल्या या धनाचे जीवापाड जतन करतो. आज पोळा, अर्थात पशुधनाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस .या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र बैलाचा सण हा पोळा म्हणून साजरा केला जातो. या सणाला बळीराजा विशेष महत्त्व देऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व शासनाच्या मदतीअभावी यावर्षी हा सण बळीराजा निरुत्साहाने साजरा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पोळा हा सण खांदे मळणी, पोळा व शिळा पोळा अशा तीन पद्धतीने साजरा करीत असतो, परंतु पावसाच्या लहरीपणामुळे खरीप पिक उत्पादनात कमालीची घट झाल्याने यावर्षी हा सण निरुत्साहत साजरा झाल्याचे दिसुन आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उसनवारी पैसे घेऊन; धन्याला शेती कामात ऊन, पाऊस व गारवा याची तमा न बाळगता वेळोवेळी इमानेइतबारे मदत करणाऱ्या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झुलीने सजवून, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या घरी विधीवत पूजा केली. पुर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे ८ ते १० बैल जोड्या असायच्या त्याकाळी पोळा या सणाची तयारी एखाद्या लग्नासारखी तब्बल १५ ते २० दिवस अगोदर सुरु होत असे. परंतु काळाच्या ओघात व यांत्रिकी युगामध्ये सर्जा राजाची संख्या कमी झाल्याने या सण साजरा करण्यात म्हणावा तेवढा उत्साह दिसून येत नाही. यावर्षी मागील १५ ते २० दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पीक परिस्थिती वाईट आहे. अशाही परिस्थितीत संपूर्ण तालुक्यात पोळा सण शांततेत पार पडला. यावेळी पोलीस प्रशासनाची सर्व ठिकाणी करडी नजर होती, अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें