प्रतिनिधी । बदनापूर
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गोकूळवाडी येथील किरण कोलते (२३) या युवकाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक असलेले संजय जऱ्हाड यांना फोन करून आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.
बदनापूर तालुक्यातील गोकूळवाडी येथील किरण कोलते हा तरूणाने येथील आयटीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केलेला होता तसेच बारावी उत्तीर्ण होता. तसेच एक हुशार व सर्वसामान्यांची काळजी घेणारा तरूण म्हणून गावात सर्वांच्या परिचयाचा होता. सध्या विविध ठिकाणी निघणाऱ्या सरकारी नोकरीसाठी तो परीक्षा व मुलाखतीही देत होता. मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रासह बदनापूर तालुक्यातही मराठा आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी होत असलेल्या विविध आंदोलनात सक्रिय सहभागी होत होता. नुकतेच बदनापूर तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातही सदरील युवकाने सहभाग नोंदवला होता.
लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल या आशेवर हे युवक होते. तथापि शासनाच्या उदासिन धोरणामुळे अजूनही आरक्षण मिळत नसल्यामुळे किरण कोलते या युवकाने टोकाचे पाऊल उचलले. तो शुक्रवारी दुपारी घरातून निघून गेला व त्याने तेथून मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक संजय जऱ्हाड यांना भ्रमणध्वनीवर फोन करून आता खूप झाले. मराठा आरक्षण मिळत नाही आणि आता सहनही होत नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात मी आत्महत्या करणार आहे असा आशयाचा फोन केला. जऱ्हाड याने त्याला फोनवर समजावून सांगत आत्महत्या करू नको लवकरच आपल्याला आरक्षण मिळणार आहे. असे टोकाचे पाऊल उचलू नको असे समजावून सांगितले. परंतु या युवकाने एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृत्यूदेह विहिरीत आढळून आल्याने त्याने मराठा समाजालाचा आरक्षण मिळत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड झाले. येथील ग्रामीण रूग्णालयात सदरील युवकाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी येथे तालुक्यातील सकल मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
शवविच्छेदनानंतर दुपारी दीड वाजता मृत्यदेह घेऊन सकल मराठा कार्यकर्ते थेट तहसील कार्यालयात आले व मृताच्या नातेवाईकाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई व भावाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करत तहसील कार्यालयातच ठाण मांडले. अखेर तहसीलदार छाया पवार यांनी असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ पाठवून लवकरच शासकीय मदत मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या शब्दाला मान देऊन सायंकाळी ५ वाजता मृतदेह घेऊन गोकूळवाडीकडे रवाना करण्यात आला तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील गोकूळवाडी येथील किरण कोलते या युवकाने आत्महत्या केल्याची कोणतीही माहिती पोलीस प्रशासन किंवा पोलीस पाटलाने मला दुपारपर्यंत दिलेली नव्हती. मी वंजारवाडी येथील सरपंचावर अविश्वास ठराव प्रस्ताव सभेल गेलेले होते. माहिती कळताच सभा पूर्ण करून तातडीने आले व जिल्हाधिकारी जालना यांना सदर कुटुंबाला आर्थिक मदत तातडीने मिळावी म्हणून कळविले आहे, असे तहसिलदार छाया पवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी सतत आंदोलन सुरू असून शासन निर्णय घेत नसल्यामुळे किरण कोलते या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे व आम्ही दीड वाजेपासून तहसील कार्यालयात या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून बसलेलो आहोत. तहसील कार्यालयातील एकही कर्मचारी पंचनामा करण्यासाठी आला नव्हता. – संजय जऱ्हाड, तालुका समन्वयक.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें