प्रशांत महाराज खानापूरकर यांचे प्रतिपादन.
सेलू प्रतिनिधी
सेलू :- संपत्तीच्या मागे धावताना आपण खऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष करतो, केवळ संपत्तीचा हव्यास करण्यापेक्षा संतती कडेही विशेष लक्ष द्या अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर (लातूर ) यांनी केले.
सेलू येथील सद्गुरू केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात आयोजित श्रावण मासाच्या निमित्ताने सुरू असलेल्या प्रवचन मालेतील ज्ञानेश्वरी या ग्रंथावर बोलताना ते म्हणाले की , आज अनेकांना जगावं कसं हेच कळत नाही. जगण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. कारण भगवद्गीता रणांगणात निर्माण झालेला ग्रंथ आहे . आपले जीवन हे सुद्धा रणांगण आहे . ते कसे लढायचे ते प्रत्येकाने ठरवायचे आहे .हसत हसत जगायचे की रडत रडत जगायचे ? प्रेमाने की द्वेषाने ? द्वेष भावनेने शब्द हे शस्त्र होतात तर प्रेमाने शब्द धनाचेभांडार होतात. शब्दांमुळे माणूस माणसात बसतो आणि शब्दामुळेच माणसातला माणूस माणसातून उठतो . घराघरात कलह शब्दामुळेच निर्माण होतात. म्हणून बोलायचे असेल तर चांगले बोला. ईश्वराविषयी बोला देवाचेच बोला अन्यथा न बोललेले किंवा मौन धरलेले अधिक चांगले . आज दिवसरात्र प्रत्येक माणूस संपत्तीसाठी धावत आहे. धावण्याला विरोध नाही पण धनासोबत चांगली मुले हीच खरी संपत्ती आहे . श्रीकृष्णाच्या कुळामध्ये एक मुलगा सांब विचित्र जन्माला आला त्याचा परिणाम कुळाचा घात झाला . आपण कमावलेली श्रीमंती जर संतती चांगली नसेल तर धुळीस जाईल याकडेही लक्ष द्या. प्रवचनातून कीर्तनातून कथेतून समाजाला तरुणांना मुलाबाळांना नैतिकतेचे धडे देणे ही काळाची गरज आहे . यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात राबवलेल्या या उपक्रमामुळे श्रावण महिन्याचा काळ सार्थकी लागला.प्रपंचाचा व्याप सोडून आपण येता म्हणजेच संत विचारांची शिदोरी घेऊन जाण्यासाठी. आपल्या प्रवचनातून काहीतरी घेऊन जा म्हणजे चप्पल नव्हे तर विचार घेऊन जा असेही ते म्हणाले. संयोजकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले . प्रवचनाला भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संजय पिंपळगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. प्रसाद वाटप व पसायदाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. श्रावण महिन्यात दररोज रात्री ८ ते ९ या वेळात प्रवचनाचे आयोजन करण्यात येते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें