या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी २७ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ३ तास ५५ मिनिटे होणार असून त्यातील खग्रास स्थिती एक तास त्रेचाळीस मिनिटे दिसणार आहे.
येत्या शुक्रवारचे २७ जुलैचे खग्रास चंद्रग्रहण हे या शतकातील ऐतिहासिक असे आहे. गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० रोजी झाले होते. त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४७ मिनिटे दिसली होती. २७ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने लालसर , काळसर दिसेल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर उत्तररात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. उत्तर रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल.सर्व ठिकाणांहून याच वेळी चंद्रग्रहण दिसणार आहे.
यापुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे ९ जून २१२३ व १९ जून २१४१ रोजी होणार असून त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४६ मिनिटे दिसणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें