परभणीत बीव्हीजी ग्रुपचे गायकवाड साधणार युवक- शेतकऱ्यांशी संवाद.
मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून सक्षमीकरण अभियान.
जिंतूर (पठाण अजमत):
भारतातील सुप्रसिद्ध भारत विकास ग्रुपचे सर्वेसर्वा हनुमंत गायकवाड परभणीत युवक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. युवा नेत्या मेघनादीदी बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात युवक - शेतकरी सक्षमीकरण अभियान राबविले जात आहे. या अभियांतर्गत विविध ऊपक्रम घेतले जाणार असून सध्याच्या प्रतिकुल परिस्थितीत आपले
जिवनमान ऊंचावण्यासाठी काय करता येईल याबाबतीत युवक आणि शेतकऱ्यांना श्री गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक धवन हे भुषविणार असून ऊद्घाटक म्हणून गंगाधरराव पवार यांची ऊपस्थिती असणार आहे.
हनुमंत गायकवाड यांनी शुन्यातून विश्वाची निर्मिती करत बीव्हीजी चा विस्तार देश विदेशात वाढवला आहे. महाराष्ट्रातील यशस्वी ऊद्योजक म्हणून त्यांचा नावलौकीक देशभर झालेला असून युवकांमध्ये ते विशेष प्रिय आहेत. अशा यशस्वी ऊद्योजकाच्या मार्गदर्शनातून आपल्या जिल्ह्यातील युवक घडावा, शेतकरी समृद्ध व्हावा, या हेतूने हा ऊपक्रम राबविण्यात आल्याची माहिती संयोजिका तथा दीपस्तंभ प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली आहे.
जमीन व माती पाणी परीक्षणाचे महत्व, विषमुक्त शेतीचा आविष्कार व आधुनिक कृषी व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या शेती तंत्राची माहिती, शेतीतील गुणवत्ता वाढीचे मंत्र, पिकांवर येणाऱ्या संकटासाठीचे पूर्व नियोजन, शेतकरी, ग्रामीण युवक व महिला यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या विविध संधी, शेतकरी कुटुंबातील आर्थिक उत्त्पन्न वाढीसाठी अथवा शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपलब्ध पर्याय, शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी आरोग्य सेवा व शिक्षण विषयक अनुदान योजना आदिंबाबतीत यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विविध शंकांचे निरसन करत ऊपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना ऊत्तरेही दिली जाणार आहेत.
विद्यापीठ सभागृहात येत्या ११ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार असून प्रवेश मोफत असला, तरी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधव आणि युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेत्या मेघना बोर्डीकर आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें