सण / उत्सवांचे समाज जीवनातील स्थान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 जून 2018

सण / उत्सवांचे समाज जीवनातील स्थान.

सण / उत्सवांचे समाज जीवनातील स्थान.

लेखक= मुजाहिद शेख.
सण / उत्सव कशासाठी?
सण/उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. जेव्हापासून सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाली तेव्हापासून सण/उत्सवांचे अस्तित्व आहे. जगात असा एकही समुदाय नाही किंवा झालाही नाही की ज्याने कधीच कोणताच सण/उत्सव साजरा केला नाही. हे सण/उत्सव समाजाचा आत्मा असतात. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने, एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे यातून समाजाचे संघटीकरण घडते. हे सण/उत्सव दरवर्षी एका निश्चित तारखेला केले जाणे, याच उद्देशाचा एक भाग आहेत. जेणेकरून वारंवारच्या आयोजनाने समाज मनावर उद्देश आणि भावना बिंबविता याव्यात.
आपल्याला सणांची गरज काय?
समाजाला सण/उत्सवांची नितांत गरज आहे. त्याशिवाय समाज संघटीत राहू शकत नाही. विखुरला जातो. म्हणूनच आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात सण/उत्सवांच्या प्रती सामाजिक ओढ जास्तच वाढली आहे. नवनवीन सण/उत्सव निर्माण केले जात आहेत, आयात केले जात आहेत, साजरे केले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वार्षिक समारंभ असोत की एखाद्या व्यावसायिक फर्मचा वर्षपूर्ती सोहळा असो, एखाद्या Whatsapp ग्रुपचा वाढदिवस असो की आणखीन काही असो! हे सारे काही त्याच मुलभूत मानवी स्वभावाचे प्रतिनिधित्व करतात, जो स्वभाव मागणी करतो की आम्हाला संघटीत राहण्यासाठी एका ‘सोहळ्याची’ गरज आहे. जेथे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव विसरून समान भावनेने, समान उद्देशाने, समान पद्धतीने एकत्र यावे; जेणेकरून एकमेकांशी जोडले जावे.
थोडा विचार करा:
जागतिक सण/उत्सवांचा बारकाईने अभ्यास केल्यास हे दिसून येते की याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. काही सण/उत्सवांच्या मागे ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी असते तर काहींच्या मागे एखादी ऐतिहासिक व्यक्ती उभी असते. या दोन्ही प्रकारचे सण/उत्सव व्यापक असतात. त्यांचा प्रभाव व्यापक असतो. उत्सवांचे प्रकार असतात तसे त्यांना साजरे करण्याचेही प्रकार असतात. काही उत्सव निव्वळ आनंदोत्सव असतात तर काही उत्सव स्मरणोत्सव असतात, ज्यात इतिहासातील त्याग आणि बलिदानांचे स्मरण केले जाते. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवरून त्या उत्सवाचा उद्देश आणि त्याद्वारे निर्माण केली जाणारी भावना यांचा अंदाज घेतला जाऊ शकतो. पद्धती आणि भावना जितकी उच्च असेल तितका त्याचा उद्देश उच्च असतो.
आपले राष्ट्रीय सण:
उदाहरणादाखल आपण आपल्या राष्ट्रीय सणाबाबत बोलूयात. येथे धार्मिक उत्सवांबद्दल चर्चा करता येऊ शकते परंतु मी जाणीवपूर्वक राष्ट्रीय सणांचा उल्लेख करीत आहे. कारण आपल्या उदात्त हेतू आणि उद्देशामुळे हे सण अतुलनीय ठरतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस भारताच्या प्रत्येक अभिमानी नागरिकासाठी केवळ सण नाहीत तर एक नवचेतना, नवप्रेरणा देणारे उत्सव आहेत. या दोन दिवसांसाठी आपले सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. हे दोन सण असे आहेत जे १२५ कोटी भारतीयांमध्ये एक नवचेतना निर्माण करतात, स्फूर्ती निर्माण करतात. शेकडो नव्हे हजारो नागरिक याच दिवसांत “आम्हाला देशासाठी काही करायचे आहे, आम्हाला समाजासाठी जगायचे आहे” असा संकल्प करतात. या दिवसांत अनेकांच्या आयुष्याची दिशा पार बदलून जाते. १२५ कोटी नागरिकांमध्ये ‘आम्ही भारतीय’ ही जाणीव निर्माण होते. ते आपल्या साऱ्या वेदना, दु:ख, हाल-अपेष्टा विसरून जातात. एकमेकांशी सहकार्याने वागायला हवे, एकमेकांशी प्रेमाने वागायला हवे याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. चोहीकडे आनंदाचे वातावरण असते. लहानग्यांना देशप्रेमाचे बाळकडू पाजले जाते. १२५ कोटींना आपण ‘भारतीय’ असल्याची जाणीव होऊन त्यांनी ‘भारतीय’ या नात्याने जगावे, हा उद्देश या सणाच्या आयोजनामागे कार्यरत असतो.
जागतिक सण:
जगभरातील सण/उत्सव यासाठीच साजरे केले जातात. त्यांच्यामागे देखील असाच हेतू कार्यरत असतो. काही ठिकाणी हेतू प्रादेशिक, सांस्कृतिक, जाती/जमातीच्या किंवा वंशाच्या अस्मितेशी जुळलेला असतो, तर काही ठिकाणी व्यापक उद्देश कार्यरत असतो. मर्यादित उद्देश असणारे सण/उत्सव प्रादेशिक सण/उत्सव म्हणून मर्यादित राहतात. ते कधीही व्यापक रूप धारण करू शकत नाहीत. एका प्रदेशात साजरे केले जाणारे उत्सव दुसऱ्या प्रदेशात साजरे केले जात नाहीत. धर्म एक असूनही प्रांत बदलले तर उत्सव बदलतात. इतकेच काय तर एक उत्सव एकाच भागातील काही लोकांसाठी आनंदोत्सव असतो; कारण तो त्यांच्या विजयाचा उत्सव असतो. तर काही लोकांसाठी अपमानजनक असतो; कारण तो त्यांच्या पराभवाचा
दिवस असतो.
एका वैश्विक सर्वव्यापी सणाची गरज आहे:
अखिल मानवजातीला संघटीत करण्यासाठी अखिल मानवजातीचा व्यापक असा सण/उत्सव असणे गरजेचे आहे. या सण/उत्सवाच्या.माध्यमाने मानवजातीला संघटीत केले जाऊ शकते. परंतु मानवजातीला संघटीत करण्यासाठी त्या सण/उत्सावांच्या मागे प्रादेशिक, प्रांतीय, जातीय, वंशीय अस्मिता नसावी तर मानवजातीला एकत्र करू शकणारी शक्ती कार्यरत असावी. ज्या उत्सवाची पार्श्वभूमी ऐतिहासिक घटना किंवा एखादी ऐतिहासिक व्यक्ती तर असावी परंतु ती जात, वर्ण, वंश यांच्या बंधनातून मुक्त असावी.
इस्लामी सण:
इस्लामने जगाला दिलेले दोन्ही सण/उत्सव याच प्रकारात मोडतात. ते अखिल मानवजातीचे वैश्विक उत्सव आहेत. इस्लामी सण/उत्सवांच्या मागे कोणतीही जातीय, प्रादेशिक, प्रांतीय, वर्णीय, वंशीय अस्मिता कार्यरत नसते. कार्यरत असते एक उदात्त विचारसरणी, एक उच्च हेतू! म्हणूनच जगभरात जेथे जेथे इस्लामचे पुनरागमन झाले तेथील जनतेने या उत्सवांना आपले उत्सव म्हणून सहज स्वीकारले. त्यांचा प्रदेश, त्यांचा वर्ण, त्यांचा वंश कोणताही असो; या गोष्टींनी कधीच हे उत्सव साजरा करण्यात अडथळा निर्माण केला नाही. अरब असोत की युरोपीय असोत, भारतीय असोत की मंगोल असोत, तुर्क असोत की इजिप्ती असोत, मलाई असोत की आफ्रिकी असोत सर्वांना या उत्सवांनी एकाच धाग्याने बांधण्याचे काम केले. एकत्रित केले, संघटीत केले. एकच समान भावना, समान उद्देश सर्वांना देण्याचे काम केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें