किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन.
पुर्वसंध्येला गडावर स्वच्छता अभियान ; उपस्थित राहण्याचे आवाहन.
समशेर खान.
सेलू :- दुर्गराज किल्ले रायगडावर सालाबादप्रमाणे यंदाही दि. 6 जुन रोजी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य छगन शेरे यांनी दिली.
रयतेच्या स्वाभिमानाचा अंकुर फुलविणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जुन 1674 ला राज्याभिषेक झाला व स्वराज्याला "छत्रपती" मिळाले. ही घटना केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवणारी ठरली. राज्यभिषेकाच्या याच स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी किल्ले रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही 5 व 6 जुन रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेतून रायगड विकास प्राधिकरणच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी, दूर्गप्रेमी, इतिहास संशोधक, वास्तूतज्ञ, पर्यावरणप्रेमी, प्रशासन यांच्या सहभागातून 5 जुनला सकाळी सात ते बारा यावेळेत रायगडाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दुपारी साडेबाराला गडावर अन्नछत्राचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता चित्त दरवाजा येथून छत्रपती संभाजीराजे भोसले हजारो मावळ्यांसोबत रायगड पायी चालण्यास प्रारंभ करतील. दुपारी साडेचार वाजता पंचक्रोशीतील 21 गावातील सरपंच व ग्रामकन्यांच्या उपस्थितीत नगारखाना येथे गडपुजनाने सोहळ्याची सुरूवात होईल. सांयकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते रायगड उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन हत्तीखाना येथे करण्यात येईल. त्यानंतर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, तर रात्री नऊ वाजता संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांशी थेट संवाद साधतील.
6 जुनला सकाळी सहा वाजता गडावर भगव्या ध्वजाचे आरोहन करून शिवराज्यभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला आरंभ होईल. राजसदरेवरील मुख्यसभामंडपात छत्रपती संभाजीराजे यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन होईल. व मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येईल. व त्यानंतर जगदीश्वर मंदिरात छत्रपती शिवरायांच्या पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन छगन शेरे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें