शिख तरुणाचे केस कापल्याने नांदेडात तणाव.
शहरातील शहीदपूरा भागात नळाचे पाणी भरण्यावरुन वाद निर्माण झाला व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात शिख समाजाचा युवक राहूलसिंह याचे केस कापल्याने या भागात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरातील पाणीपुरवठा विभागाचे वेळापत्रक व नियोजन बिघडल्याने कुठल्याही वेळी पाणी येतआहे. रविवारी शहीदपूरा भागात अचानक नळाला पाणी आल्याने सार्वजनिक नळावर एकच गर्दी झाली. पाणी भरण्याच्या कारणावरुन उदामिरे कुटुंबिय आणि पुजारी कुटुंबियात मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. उदामिरे कुटूंबियांनी राहूलसिंह या शिख तरुणास घरात नेऊन बेदम मारहाण केली व त्याचे केस कापून टाकले.शिख समाजात केस कापण्यास प्रचंड विरोध असून,त्यांनी शिख धर्मात केस राखण्याची परंपरा आहे. राहूलसिंघ याचे केस कापल्याचे वृत्त लगेच शिख समाजात व परिसरात समजले. त्यावेळी शहीदपुरा भागात मोठा जमाव निर्माण झाला. त्यानंतर बरेच जण पोलीस ठाण्यात आले. याबाबत साई कौर ओमसिंघ पुजारी या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी अंजली उदामिरे, मारोती उदामिरे, जयश्री उदामिरे, किशन उदामिरे व सोनू यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल व मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंडळींनी उदामिरे कुटुंबियांना देखील बेदम मारहाण केली. त्यातील एक जण बेशुद्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उदामिरे कुटुंबियांकडून हे वृत्त लिहिपर्यंत कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती. मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने वजिराबाद पोलिसांनी शहीदपूरा भागात तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा बंदोबस्त लावला होता. मात्र पोलीस निरीक्षक काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगला बंदोबस्त व नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर हा तणाव निवळला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें