आमदार इम्तियाज जलीलचे खासदार खैरे यांना खुले पत्र..... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 22 मई 2018

आमदार इम्तियाज जलीलचे खासदार खैरे यांना खुले पत्र.....

आमदार इम्तियाज जलीलचे खासदार खैरे यांना खुले पत्र.....

स्वैर अनुवाद=मुजाहेद शेख.
आपण अलीकडील तणावग्रस्त वातावरणात आपल्या पत्रकार परिषदांमध्ये, वृत्तवाहिनींवरील मुलाखतींमध्ये, तसेच जाहीर सभांमध्ये आणि पोलीस वर्गासमोर केलेली वक्तव्यं मी व औरंगाबाद शहराच्या सर्वच नागरिकांनी ऐकली आहेत. आपण या सर्व वक्तव्यांत किमान शंभर वेऴा म्हणालात की, "मी सर्व हिंदूंचे रक्षण करणार. मी हिंदूंचा नेता आहे. मी हिंदूंचा पहिला आमदार होतो, मी हिंदूंचा खासदार आहे."
क्षमस्व आहे खा. खैरे साहेब आपलं हे मत वाचून व ऐकून एक संवेदनशील मानवतावादी औरंगाबादी नागरिक या नात्याने मला खूप वेदना झाल्या आहेत आणि औरंगाबादच्या लाखों जागरूक नागरिकांनाही हे मत बोचलं आहे. आपले हे वक्तव्य म्हणजे काही गुन्हा नसला तरी आपल्या सकुंचित मानसिकतेचे विखारी विचारांचे उत्तम उदाहरण आहे.
खा. खैरेसाहेब, आपण चूकीचं बोलता आहात. आपण केवऴ हिंदूंचे नव्हे तर माझ्यासह या सुंदर शहरातील सर्व मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, शीख, जैन, पारशी आदि सर्वांचे खासदार आहात. आम्हा सर्वांचे आहात खासदार आहात. खा. खैरेजी, देशातील १३० कोटी नागरिकांपैकी फक्त ५४३ नागरिकांना खासदार होण्याची संधी मिऴते व ती संधी वारंवार मिऴालेले भाग्यवान आपण आहात. तुम्ही या शहराचे वरिष्ठ नेते आहात. परंतु जेव्हा केव्हा असामाजिक असे काही घडते तेव्हा तुम्ही स्वतः एका विशिष्ट जाती धर्माचा नेता म्हणून मिरवू लागता. तुम्हाला याचे देखील भान राहत नाही की तुम्ही या शहरातील प्रत्येक नागरिकाचे नेते आहात. या शहराप्रती व इथल्या सर्व नागरिकांप्रती आपली जबाबदारी आहे. खासदार व लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांची काऴजी घेणे व संरक्षण करणे हे तुमचे काम आहे, कारण तुम्ही आम्हा सर्वांचे नेते आहात. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत ओढून ताणून तुमचा धर्म, तुमची जात घेऊन येता तेव्हा खूप वेदना होतात. तुम्हाला असं करण्याची काहीच गरज नाही.
मा. खैरेसाहेब, आपण हिंदू आहात. लाखों लोक हिंदू आहेत व ते एक जीवनशैली म्हणून हिंदू धर्माचे पालन करीत आहेत. केवळ मी हिंदू आहे, मी हिंदू आहे या वक्तव्याची पुनरावृत्ती केल्याने तुम्हाला समाजाच्या दृष्टीत एक आदर्श हिंदू होता येणार नाही. आदर्श हिंदू होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कृती आणि उक्तीतून आपले धर्माचरण समाजाला दाखवून द्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपल्या सर्व रयतेसाठी आपल्याला कार्ये करावी लागतील.
खासदार खैरे साहेब, गेल्या आठवड्यात आपल्या शहरात जे काही दुर्देवी, अभद्र व शांती भंग करणारे घडले त्याला ना तुमचा हिंदू धर्म जबाबदार आहे ना माझा इस्लाम. या धर्मांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. याला जबाबदार आहेत या दोन्ही धर्मातील अपप्रवृत्तीची मुठभर माणसे. या समाजकंटक प्रवृत्तीच्या मोजक्या लोकांना त्यांचा धर्म काय सांगतो व शिकवतो तेच कऴालेले नाही. ते आपल्या कृतीने आपल्या धर्माची बदनामी करतात. दु:ख याचे वाटते की, आपणही त्यांच्यापैकीच एक आहात. कारण तुम्हाला अजूनही तुमचा सहिष्णू धर्म कळला नाहीये.
कारण खा. खैरेसाहेब, गेल्या आठवडाभरात जेव्हा शहराला तुमची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही पुन्हा आपला विखारी खेळ खेळला. आपण शहराचे नेते या नात्याने दोन समाजातील तणाव कमी करून आम नागरिकांसाठी लवकरात लवकर शांतता स्थापित करण्यासाठी झटायला हवे होते. शहर शांत करणे ही आपली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिली जबाबदारी होती , त्याऐवजी आपण धार्मिक तणाव वाढवण्याचे काम करीत राहिलात. वातावरण चिघऴविणे व शहराचे देशात नाव ख़राब करणे आपणास शोभा देत नाही. दंगल करणारे मुठभर एकदोन हजार हिंदू किंवा मुस्लीम असतील पण औरंगाबाद शांत रहावे , हिंदू व मुस्लीमांनी गुण्यागोविंदाने व प्रेमाने रहावे असे वाटणारे लाखों हिंदू व मुस्लीम आहेत हे खरे नव्हे का? परंतु तुम्हाला हे लोक नको होते, नव्हे का?
खा. खैरेसाहेब, दोन्ही समाजातील पुढारी वर्गास सोबत घेऊन आपल्या शहरात शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची तुमची जबाबदारी होती. कारण शहराचे आपण वर्षानुवर्षे खासदार आहात. त्याऐवजी तुम्ही वातावरण भडकावायचे व दोन्ही जमातीतील तणाव वाढविण्याचे प्रयत्न करीत आहात. शहरातील सर्व धर्मात नागरिकांना शांतता हवी आहे, धार्मिक सामंजस्य हवे आहे. धार्मिक तणाव व दंगल आम जनतेस नको आहे. वीस वर्षापूर्वीचे औरंगाबाद आता राहिलेले नाही, जेव्हा तुम्ही प्रथमच खासदार झाला होता. माझे खासदार, या शहराचे खासदार. औरंगाबादच्या जनतेच्या लक्षात आले आहे की, दंगल आणि धार्मिक तेढ व तणाव काहीच फायद्याचे नाहीत. शिवाय त्याच्या ज्यांना यातुन राजकीय लाभ प्राप्त करायचा असतो. माझा इशारा कोणाकडे आहे, हे तर आपण समजलाच असंच खैरे साहेब.
खा. खैरे साहेब, लोकाखा. खैरे साहेब, लोकांना शांतता हवी असताना व शहर शांत व स्थीर होत असताना आपण हे वातावरण कलुषित करणारी भूमिका घेत आहात. आपण पोलीसांची परवानगी नसताना व शहर शांत झाले असताना हिंदू शक्ती मोर्चा काढता, यामागे तुमचे कोणते अजेंडे लपले आहेत, हे वेगळे सांगायला नको. ज्या शहराने तुम्हाला एवढा मान सन्मान दिला, नेतृत्व दिले; तिथले जनजीवन क्षुद्र राजकीय फायद्यासाठी ख़राब करणे योग्य आहे का? कदाचित तुम्हाला शहराला पेटत ठेवायचं आहे. कदाचित तुम्हाला शांतता नको आहे. खैरे साहेब, आमची इच्छा होती, शहराची इच्छा होती, शांतता प्रेमी हिंदू-मुस्लिम बांधवांची इच्छा होती की तुम्ही शांती मोर्चा काढायला हवा होता. तुम्ही शांती मोर्चाचे नेतृत्व करायला हवे होते. सारा शहर तुमच्या नेतृत्वात त्या मोर्च्यात सामील झाला असता. परंतु तुम्ही ती संधी गमावलीत. तुमच्या संकुचित मनोवृत्तीमुळे तुम्ही ती संधी गमावलीत.
खा. खैरे साहेब, तुम्ही आणि तुमचा पक्ष गेली इतके वर्षे या शहराची सत्ता उपभोगत आहात, राजकारण व स्वार्थ यापलिकडे जाऊन आपल्या लाडक्या शहरासाठी व सर्वधर्मीय जनतेसाठी काम करायला नको का? कधीपर्यंत या शहराप्रती कृतघ्नता? जनतेची हीच इच्छा आहे कि तुम्ही जनतेची कामे करावीत. लोकप्रतिनिधी म्हणून ही इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. आपले आवडते शहर रस्त्यावरील कचरा व दुर्गंधीने व्यापून गेले असताना, त्यांना प्यायला पाणी मिऴत नसताना, रस्ते व पायाभूत सुविधा नसताना आपण त्यासाठी अहोरात्र काम करायचे सोडून धार्मिक संघर्ष वाढविण्याचे काम करत आहात. तुम्ही चांगले रस्ते, चांगले पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी लढा द्यायला हवा होता. परंतु तुमच्यासाठी तर प्राधान्यक्रमाचे मुद्दे हे कधीच नव्हते, श्री खैरे. याउलट तुम्ही औरंगाबाद / संभाजीनगर, हिंदू / मुस्लिम, मंदिर / मशिदी करण्यात तुमचं सार राजकीय आयुष्य घालविल आहे. या दंगलीत प्राण गमावलेल्या निरपराध वृध्द नागरिकाची व हकनाक बऴी पडलेल्या १७ वर्षाच्या कोवऴ्या तरूणाच्या कुटूंबियांच्या भावना तुम्हाला जाणवत नाहीत काय? ज्या गरीबांची घरे, दुकानें व हातगाड्या दंगलीत जऴून ख़ाक झाल्या त्यांचेसाठी आपणास काहीही करावे वाटत नाही व उलट धार्मिक तणाव बिघडवण्याचे आपण प्रयत्न करीत आहात हे सामान्य नागरिकांना पटलेले नाही खा. खैरेसाहेब !
मी स्वत: लोकप्रतिनिधी या नात्याने या दंगलीत ज्यांची दुकाने व घरे जऴाली त्यातील हिंदू व मुस्लीम या सर्वांची मदत करतो आहे. त्यात गरीब मुस्लीमांसह १८ हिंदूंही आहेत. त्यात मी आपला व तुपला करीत नाही. आपलातुपला करणे ही माणूसकीला काऴीमा फासणारी बाब आहे. मी शाहगंज मश्जिदजवऴील हिंदू स्वामींचे दंगलीत जऴालेले आइस्क्रीमचे दुकान पुढाकार घेऊन बांधून देतो आहे. त्या स्वामींना मी जेव्हा म्हणालो की, आपलं आइस्क्रीमचे दुकान पुन्हा उभे राहिले की, उदघाटनाला व आइस्क्रीम खायला मी येईन. माझे हे बोल ऐकून स्वामींच्या चेहरा आनंदानं उजऴून निघाला होता. हा आनंद अनमोल आहे खा. खैरेजी! असे आपण गुलमंडीवरील जऴालेले औरंगाबाद सिल्कचे मुस्लीम बांधवाचे दुकान पुन्हा उभे करण्याचा पुढाकार घेऊन काम करून दाखवू शकाल का? अशाप्रसंगी जातीधर्माच्या पलीकडं जाण्याची हिंमत लागते. ती तुम्ही दाखवावी खा. खैरेजी! तुम्ही "हिंदू शक्ती मोर्चा" काढला व त्याची प्रतिक्रिया म्हणून मी "मुस्लीम शक्ती मोर्चा" सहज काढू शकलो असतो, पण मी तसे करणार नाही. दंगल घडविणारे समाजकंटक हिंदू असो की मुस्लीम, त्यांचेवर कड़क कारवाई करावी असे मी पोलीस कमीशनरांना सांगितले आहे आणि तुम्ही फक्त मुस्लीमांनी अटक करा म्हणता. दंगलीत दोन्ही जमातीतील समाजकंटक सहभागी नव्हते काय? त्या सर्वांवर कारवाई नको का व्हायला? दंगल भडकविणारा कोणीही असला, जरी खा. खैरेही असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका नको का आपण घ्यायला? अजूनही वेऴ गेलेली नाही.
चला खा. खैरे साहेब, लोकप्रतिनिधी म्हणून आपण दोघे पुढाकार घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शांती मार्च काढूया. आपल्या या लाडक्या शहरात पुन्हा दंगल होणार नाही असं वातावरण तयार करूया. शहरातील आम जनतेसाठी कचरामुक्ती, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य ही अधिक महत्वाची कामं आपण खासदार व आमदार म्हणून करावी असं औरंबादकरांना वाटते आहे. ते काम तुमच्यासोबत करायला मी तयार आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पहातो आहे खा. खैरेसाहेब!
शहराचा एक नागरिक व आमदार
इम्तियाज़ ज़लील

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें