नांदेड लग्नातल्या बिर्याणीतून दीडशे जणांना विषबाधा.
प्रतिनिधी.नांदेड.दि.30/04/2018.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील विवाह सोहळ्यातील समारंभात रविवारी रात्री बिर्याणी खाल्यामुळे १५० जणांना विषबाधा झाली. यातील सर्व रुग्णांना मुदखेड आणि नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. मुदखेड येथील मौलाखान मुर्तुजाखान यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. विवाहानंतर शाहीभोजन व्यवस्था करण्यात आली होती. यात वेगवेगळी बिर्याणी, हरीश, डबल का मिठ्ठा पान आदी विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. अनेकांनी याचा आस्वाद घेऊन वधू वरांना शुभेच्छा दिल्या. घरी परतल्यानंतर अनेक वऱ्हाडी आणि अन्य मंडळींना पोटात दुखू लागले तर अनेकांना संडास, उलट्या होऊ लागल्या तर अनेकांना मळमळ होऊन चक्कर येऊ लागली. बघता बघता ही संख्या १५० च्या आसपास गेली. त्यामुळे सर्वजण घाबरून गेले. यातील काही गंभीर झालेल्या वऱ्हाडींना नांदेड येथे हलवण्यात आले. त्यांच्यावर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींवर मुदखेड येथे उपचार सुरू केले. मुदखेडच्या राज्य राखीव दलाचे जवान आणि तेथील वैद्यकीय पथकाने तातडीने हालचाली केल्या आणि विषबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले. सध्या या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मुदखेड इथे रवाना झाले. मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णआणि नातेवाईक यांची प्रचंड गर्दी झाली होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें