तब्बल ६ वर्षांनी पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची गळाभेट.
धनंजय मुंडे यांना एका खासगी कार्यक्रमात एक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र या कार्यक्रमापेक्षाही लक्षात राहिली ती व्यासपीठावर घडलेली घटना. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची व्यासपीठावर गळाभेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपल्या राजकारणाची श्रेष्ठ परंपरा पाहिली. एकमेकांविरोधात सत्तेत असलो तरीही सार्वजनिक ठिकाणी राजकीय मतभेद विसरायचे असतात. मात्र या दोघांकडूनही या आधी मागील ६ वर्षात सार्वजनिक कार्यक्रमातही अशी भेट घडली नव्हती. ती आज घडली, हे दोघेही एकमेकांकडे पाहून दिलखुलासपणे हसले. पंकजा मुंडे यांनी आपला भाऊ धनंजय मुंडे यांची राजकीय मतभेद विसरून गळाभेट घेतली. ही गळाभेट पाहणे हा उपस्थितांसाठी एक सुखद धक्काच होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.२०१२ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हापासूनच मुंडे घराण्यातला उभा दावा समोर आला. काका गोपीनाथ मुंडे यांना गुरु मानणारे धनंजय मुंडेंनी अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली तेव्हा बीडचे राजकारणही ढवळून निघाले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातली दरी काही दूर झालेली महाराष्ट्राने पाहिली नाही. मात्र आज मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर होताच मंचावर जाऊन त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य निश्चितच वेगळे आणि समाधानकारक होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें