समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्वज्ञान म्हणजे भारूड- डॉ . श्री .रामचंद्र देखणे.
समशेर खान.सेलू / प्रतिनिधी
भा. शि .प्र. संस्था अंबाजोगाई स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म. औरंगाबाद प्रायोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या पहिल्या विचारपुष्पात (दिनांक १० एप्रिल ) ते बोलत होते .व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष आहे . नाथांचे भारूड - एक सामाजिक उपक्रम या विषयावर त्यांनी विचारपुष्प गुंफले .पुढे बोलताना ते म्हणाले की , नाथांनी जनसामान्यांचे अनुभवविश्व भारुडांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने मांडुन सामाजिक विवेकाला आवाहन केले आहे. सदाचार व नीती यावर त्यांनी भर दिला आहे.
भारुडे लिहिताना त्यांनी वासुदेव ,गोंधळी ,पिंगळा ,जोशी ,पोतराज यांसारख्या लोकभूमिकांचे माध्यम वापरले. शिमगा ,होळी ,गोंधळ ,फुगडी यांसारखे सण व खेळ तसेच विंचू ,सर्प ,गाय ,एडका ,पोपट यांसारखे पशुपक्षी उपयोगात आणले. रूपक पद्धतींनी भारुडे लिहिली आहेत.धर्माचा खरा अर्थ सांगत समाजाला निर्भय बनविले.
व्यवसाय ,नाती - गोती ,सामाजिक वृत्तीदर्शन ,गाव ,दैवी भूमिका असे विविध विषय एकनाथांच्या भारुडात दिसुन येतात.काही भारुडांतून विवेकाचा होरा मागितला आहे, काहींमधून सामाजिक विकारांचे व्यंगात्मक विनोदी पद्धतीने लोकांसमोर उभे केले .
दान पावलं दान पावलं ,भवानी आई रोडगा वाहील तुला अश्या काही भारुडांचे थोडक्यात विवेचन त्यांनी केले . सद्य स्थितीत समाजातील वाईट प्रवृत्ती ,अविचार ,अविश्वास नष्ट करण्यासाठी भारुडांतून जनजागृती होणे ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक श्री .सुनील रायठठ्ठा होते. देवगिरी बँकेचे संचालक श्री.राजेश जैन ,श्री .गौतमराव सूर्यवंशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप सुनील रायठठ्ठा यांनी केला. राजेश जैन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी , पद्य स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले.प्रास्ताविक किरणराव डुघरेकर ,आभार सौ .सीमा आष्टीकर यांनी मानले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें