भाजपाला रोखण्यासाठी विरोधक एकवटले, NCP अध्यक्ष शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत ममता बॅनर्जी होणार सहभागी.
2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येऊ न देण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगली कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचा पाडावा करण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये बैठकांवर बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पुढील आठवड्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी 26 मार्चपासून नवी दिल्लीच्या दौ-यावर असणार आहेत. यावेळी भाजपा विरोधात लढा उभारणा-या विरोधी पक्षांना त्या समर्थन दर्शवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. शिवाय, यावेळी अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्या भेट घेणार आहेत. सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतही ममता बॅनर्जींच्या बैठकींचं आयोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, शरद पवार नवी दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन करणार आहेत. या बैठकीमध्ये 2019 लोकसभा निवडणूक या महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा होणार आहे. निवडणुकीतील रणनीतीवर विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेससहीत सर्वविरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें