देश मोठा होण्यासाठी वाचन संस्कृती आवश्यक =लक्ष्मीकांत देशमुख
समशेर खान.
सेलू : देश मोठा होण्यासाठी वाचन संस्कृती विकसित होणे आवश्यक आहे.असे मत ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. ते नूतन महाविद्यालय,सेलूतील शैक्षणिक संस्था आणि ग्रंथालयाच्या वतीने नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात मंगळवार दि.२७ रोजी आयोजित वाचक संवाद या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते. पुढे आपल्या भाषणात लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की,एक सुसंस्कृत,समृद्ध देश,समाज निर्माण होण्यासाठी ग्रंथालय आणि ग्रंथ वाचणे महत्वाचे आहे. मानवतावादी,विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ माणसे वाचनातूनच घडतात. राष्ट्र विकासासाठी ग्रंथ,ज्ञान,विचार सत्ता निर्माण व्हावी असे ही ते म्हणाले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी आणि वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. या कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डि.के.देशपांडे,सहसचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर,शिक्षक,प्राध्यापक,ग्रंथपाल,साहित्यिक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश ढवारे यांनी केले.सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ.मोहन काटकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात चंद्रशेखर नावाडे,सर्जेराव लहाने,महादेव आगजाळ यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी =सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या कै.रा. ब.गिल्डा सभागृहात आयोजित वाचक संवाद कार्यक्रमात बोलतांना लक्ष्मीकांत देशमुख व्यासपीठावर डॉ.एस.एम.लोया.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें