चवदार तळ्याचा लढा मानवतेच्या हक्कांसाठीच
प्रकल्पाधिकारी- दि.फ. लोंढे
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१९मार्च २०१८
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी येथील अस्पृश्य समजल्या जाणार्या जातीतील नागरिकांना सन्मानाने पिण्यास मिळावे, यासाठी केला असला तरी बाबासाहेबांचा हा पहिला सत्याग्रह मानवतेच्या हक्कांसाठीच होता, अशी माहिती बार्टीचे प्रकल्पाधिकारी दि. फ. लोंढे यांनी दिली.
आज सोमवार दि.१९ मार्च रोजी मौजे नैकोटवाडी येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह सप्ताहनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी लोंढे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी पोलीस पाटील तानाजी आचार्य, ज्येष्ठ नागरिक रोहिदास झाटे, शिक्षक पिसाळ, सोनपेठ तालुक्यातील समतादूत अंकुश रसाळ, गंगाखेडचे समतादूत चंद्रदीप मुजमुले यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस पाटील तानाजी आचार्य यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.
सद्या बार्टीच्या वतीने राज्यात चवदार तळ्याचा सत्याग्रह सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोंढे पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील मागासवर्गीयांना चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून खर्या अर्थाने आपणही माणूस असल्याची जाणिव करून दिली. हा सत्याग्रह म्हणूनच मानवतेचा संगरच होता. यातूनच हजारो वर्षांपासूनच्या अस्पृश्यांच्या पशूहीन जगण्याला तिलांजली मिळाली असून समतेच्या लढ्याची हिच पायाभरणी होती.
सूत्रसंचालन बार्टीचे गंगाखेड तालुका समतादूत चंद्रदीप मुजमुले यांनी केले तर आभार सोनपेठ तालुका समतादूत अंकुश रसाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें