सोनपेठ येथे शिव जयंती निमित्त ग्रंथदान
जयंत्या साजऱ्या करा सोबतच थोरांचे चरित्रही वाचा-पो.नि.सोपान सिरसाठ
सोनपेठ(राजेश खेडकर)
सोनपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज दि.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ च्यावतीने येथील डॉ.झाकेर हुसैन उर्दु माध्यमिक विद्यालयात ग्रंथदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. बहरीन येथुन सोनेराव गायकवाड यांनी चळवळीस दिलेल्या आर्थिक योगदानातुन तालूक्यातील पांच शाळांना यावेळी पुस्तके भेट देण्यात आली. याच कार्यक्रमात बालाजी इंगोले यांनीही डॉ.झाकेर हुसैन हायस्कुलला पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमाची सुरूवात हायस्कुलचे विद्यार्थी दानिस अन्सारी व मुस्कान बागवान यांनी प्रे.मो.पैगंबर यांच्या नात व पवित्र कुराणातील आयताच्या वाचनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन हायस्कुलचे मुख्याध्यापक अफझाल सिद्धीकी होते, तर गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण व पो.नि.सोपान सिरसाठ, प्राथमिकचे मुख्याध्यापक सय्यद कादर अली व कै.बाजीराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार धबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य शिवमल्हार वाघे यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी ग्रंथ वाचन चळवळीच्या उपक्रमांची माहिती देऊन, शिवजयंती निमित्त विदेशात राहुन देश बांधवांविषयीची आपुलकी बाळगुन ग्रंथ भेट देण्यासाठी आर्थिक मदत पुरविल्याबद्द सोनेराव गायकवाड यांचे आभार व्यक्त केले. गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा उर्दु भाषेतुन मार्गदर्शन करतांना पुस्तके वाचन्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पवित्र कुराणातील शिक्षण व अभ्यासावरील विचारही प्रकट केले. पोलीस निरिक्षक सोपान सिरसाठ यांनी जीवनातील वाचनाचे महत्व विशद करतांना थोर व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या कराच, परंतु त्यांचे कार्य व शिकवण समजुन घेण्यासाठी पुस्तकांचे वाचन करन्याचे आवाहन यावेळी बोलतांना केले.
कार्यक्रमात ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, सदस्य प्रा.डॉ.संतोष रणखांब, मल्लिकार्जुन सौंदळे, बालाजी इंगोले, जि.प.प्रा.शा.वाणीसंगम येथील विद्यार्थिनी कु.अर्पिता वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात अफझाल सिद्धिकी यांनी त्यांच्या शाळेत शिव जयंती निमित्त ग्रंथदानाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल चळवळीचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक अ.गणी यांनी केले तर सहशिक्षक रियाज अहमद खान यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य सर्वश्री सुधिर बिंदू, सय्यद ख़दिर, राधेश्याम वर्मा, मुख्याध्यापक दत्ता पवार, अंकुश परांडे, ग्रंथपाल सरकाळे, सह शिक्षीका आसरा परवीन, अस्मा खान, पत्रकार शिवाजी कुंभारीकर, डाटा अॉपरेटर ओम परांडे आदींसह हायस्कुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हायस्कुलचे कर्मचारी मुस्ताक खान, सकिऊल्ला खान व अब्दुल सलाम यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें