योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि-12-03-2019
कायगांवसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास
१५ मार्चला गोदावरी नदीत पुन्हा जलसमाधी आंदोलनाचा इशारा
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी कायगांव येथे जुलै १८ मध्ये काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर राज्यभरात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रीयानंतर घडलेल्या घटनांमध्ये समाजातील हजारो युवकांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा १५ मार्च रोजी पुन्हा त्याच ठिकाणी जलसमाधी आंदोलनाचा इशारा गंगापूर येथील बैठकीत देण्यात आला.
शहरातील शासकीय विस्रामगृहात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकत्यांच्या आज दि. ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व सर्व संबंधितांना सह्यांसह लेखी निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ५८ मोर्चे लोकशाही व शांततामय मार्गाने काढूनही न्याय न मिळाल्याच्या कारणामुळे व जलसमाधी आंदोलनाचा इशारा देउनही २३ जुलै २०१८ मध्ये काकासाहेब शिंदेसह इतर युवकांना बलिदान द्यावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने मराठा समाजातील युवकांवर कायगांवसह राज्यभरात घडलेल्या घटनांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, काकासाहेब शिंदेसह शहीद झालेल्या ४५ तरूणांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली शासकीय आर्थिक मदत व नोकरी देण्यात यावी व समाजाच्या इतर मागण्यांबाबत वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची प्रामाणीकपणे पूर्तता तातडीने करावी अन्यथा दि. १५ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता कायगांव येथील गोदावरी पुलावर शहीद काकासाहेब शिंदे सेतूवर सामुहिक जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें