०९ उपोषकर्त्यांची प्रकृती खालावली - एकाला अतिदक्षता कक्षात हलविले ;
शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष उपोषणकर्ते अब्दुल समीर यांचा आरोप ;
शेख कलीम
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.३० ) सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ०९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यातील चौघांची तब्येत अधिक गंभीर आहे. शासन व प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे एकंदरीत परिस्थिती जाणवत आहे.
सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करावे, तसेच अल्पशा व लहरी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एका वर्षाची नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर सोळा दिवस साखळी उपोषण केल्यावर प्रशासनाकडून कुठल्या प्रकारे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समज उपोषणकर्त्यांचा झाल्याने बुधवार दि.२९ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. वरील मागण्यांसाठी २१ उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्याना मोठ्या प्रमाणात अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. आमरण उपोषणकर्त्यांमध्ये दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.३० रोजी ०९ आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे. निजाम पठाण या उपोषणकर्त्याचे अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात पाठवावे लागले आहे. इतर उपोषणकर्त्यांना वैद्यकीय पथकाने उपचार घेण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सपशेल नकार दिला आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती वेगाने खालावत असून प्रशासन तातडीने आमरण उपोषणकर्त्यांशी योग्य संवाद साधून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. परंतु उपोषणकर्त्यांची आरोग्य परिस्थिती पाहता शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे. उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण मागे घ्यावे यासाठी आज दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. ३० रोजी योग्य भूमिका घेत पाऊल उचलने गरजेचे आहे. कदाचित रात्रीतून उपोषणकर्त्यांची प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमरण उपोषणाच्या दरम्यान खालील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. निजाम पठाण, विठ्ठल सपकाळ, फहिम पठाण, लक्ष्मण कल्याणकर, शेख सलीम हुसेन, रवि आरके, रईस पठाण मुजावर, कुणाल सहारे, मनोहर आरके, व शेख बाबर बागवान , यांचा समावेश असून निजाम पठाण, विठ्ठल सपकाळ, फईम पठाण, लक्ष्मण कल्याणकर या उपोषणकर्त्यांची प्रकृती अधिक खालावलेली आहे. नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे यांच्यासह अमित आरके, अकील देशमुख, राजेंद्र बन्सोड, हाजी मोहम्मद हनिफ, जगन्नाथ कुदळ, रुपेश जैस्वाल, जमीर मुलतानी, रघुनाथ कल्याणकर, विठ्ठल जैवळ, सखाराम अहिरे यांची आजच्या स्थितीला प्रकृती स्थिर असली तरीही सर्वच उपोषणकर्त्याना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आलेला दिसून येत आहे.
* शेतकऱ्यांचे शत्रू असलेले भाजपाचे निगरगट्ट शासन - नगराध्यक्ष अब्दुल समीर
शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत शासनाला काहीच सोयरसुतुक नाही. भाजपाचे शासन शेतकऱ्यांचे नव्हे तर पडकुट्या निरव मल्याचे आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने ही आता आर पारची न्याय हक्काची लढाई आहे.असा निर्धार नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केला.
शेतकरी काँग्रेस पक्षाचे दैवत - देविदास लोखंडे काँग्रेस पक्ष सातत्याने शेतकरी शेतमजुरांसह गोर गरीब व सामान्य जनतेचा लढा देत असून शेतकाऱ्यांसाठीचा आमरण उपोषणाचा हा लढा हक्काचा आहे.आमच्या मागण्या शासनाला मान्य कराव्याच लागतील असा विश्वास काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे यांनी व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें