"काला"आणि "मुस्लीम".एक विचार करणारे लेख अवर्जुन वाचा.
लेखक=मुजाहिद शेख.
'काला' पाहिला का? साउथ चित्रपट जो नुकताच रिलीज झाला आहे. पाहिला नसला तरी वृत्तपत्रांतील लेख आणि सोशल मिडियावरील वरील चर्चा वाचली असेल ना? दलित समाज, त्यांचे जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचे विचारविश्व, त्यांचे आदर्श हे ‘काला’ चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. दलित मानसिकता घडविणाऱ्या असंख्य गोष्टी चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात अत्यंत चपखलपणे बसविण्यात आल्या आहेत. जसे चित्रपटाची सुरुवात ज्या दृश्यापासून होते त्या दृष्ट्यातील गौतम बुद्ध विहार, पुढील एका दृष्ट्यातील पेरीयारांची मूर्ती, तसेच खाली दिलेल्या पोस्टरमध्ये रजनीकांत ज्या जीपवर बसलेला आहे त्या जीपचा नंबर MH 01 BR 1956 असा आहे, जी मुंबई येथे आंबेडकरांनी १९५६ साली केलेल्या धर्मांतराची तारीख आहे. ‘काला’ चित्रपटावर होणारी कोणतीही चर्चा चित्रपटाचा हाच पैलू ‘ताकदीने’ मांडत आहे. चित्रपटात 'दलित' पात्र हिरोच्या रुपात साकारलं जातंय, हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
आता जरा गृहीत धरा, या चर्चेतील 'दलिता'ला आपण 'मुस्लिम'ने बदलून टाकू. मुस्लिम समाज, त्यांचे जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचे विचारविश्व आणि त्यांचे आदर्श चित्रपटांत कशाप्रकारे दाखविले जाते यावर जर कोणी चर्चा केली असती तर अनेकजण अशा चर्चवर जातीयवादाचा ठपका ठेऊन मोकळे झाले असते. चर्चा करणारी व्यक्ती मुस्लिमेत्तर असती तर त्याला ‘बाटलेला’ ठरविले गेले असते आणि जर ती व्यक्ती मुस्लिम असती तर तिला 'मूलतत्त्ववादी' ठरवून मोकळे झाले असते.
चित्रपटांतला मुस्लिम:
याचा अर्थ चित्रपटांतून मुस्लिम कधीच साकारला गेला नाही, असा नाही. एक दोन नव्हे शेकडो असे चित्रपट आहेत ज्यातून मुस्लिम समाज मांडला गेला आहे. अशा चित्रपटांची संख्याही कमी नाही ज्यात 'मुस्लिम' हिरोच्या सहाय्यकाच्या किंवा हिरोच्या रुपात दिसला आहे. परंतु हे चित्रपटातील ‘मुस्लिम’ असणं आणि वास्तविक मुस्लिम असण्यात खूप मोठा फरक असतो. चित्रपटातील मुस्लिम पात्र नेहमीच ज्या प्रकारची Balancing करताना दिसतो, तशी तारेवरची कसरत दलित पात्राला करावी लागत नाही.
दलित असण्याचा सार्थ अभिमान:
दलित व्यक्ती मग ती कोणीही असो, आपले दलित असणे ठासून मांडते. 'हो आहे मी दलित, पुढंच बोल!' असा रोष प्रत्येक दलिताचा असतो. साहित्यिक, लेखक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध रुपात तो आपले दलित असणे ठासून मांडतो. आपली दलित असण्याची प्रतीकं तो प्रत्येक ठिकाणी विखुरण्याचा प्रयतन करीत असतो. दलित असणे हीच त्याच्या जीवनाची पहिली पायरी असते. दलित समाजाचे अस्तित्व हाच त्याच्या अस्तिवाचा आधार असतो. तो स्वतःला दलित समाजाचा अविभाज्य बाग समजतो. समजाची ओळख हीच त्याची ओळख असते. यामुळेच तो ‘दलिततां’च्या समस्या आणि प्रश्न चांगल्याप्रकारे समजू शकतो. ‘दलित’ असल्यामुळे होणारा दुजाभाव तो ठासून मांडू शकतो. परंतु मुस्लिमांना हे जमत नाही. किंबहुना हे त्यांना जमुच नये, याची पुरेपूर व्यवस्था केली जाते. दलित व्यक्ती कधीही स्वतः दलित समाजापासून वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करीत नाही, याउलट मुस्लिम व्यक्ती मात्र मी माझ्या समाजासारखा ‘मुस्लिम’ नाही हेच नेहमी सांगत असते.
मुस्लिम असतानाची Balancing:
मुस्लिम व्यक्ती असो कि चित्रपटातील पात्र, तो स्वतःला काल्पनिक ‘मुख्य प्रवाहात’ सामील करवून घेतानाची केविलवाणी धडपड करताना आढळतो. मुस्लिम पात्राची केविलवाणी धडपड पहा. चित्रपटात तो जुमेची नमाज पढण्यासाठी मस्जिदीतही जातो तर आपल्या मित्रासोबत मंदिरात जाऊन मुर्तीपुजाही करतो. दलितांना मंदिरात जाण्याची काहीच गरज नसते. आणि गृहीत धरा एखादा दलित मंदिरात जाऊन मूर्तीपूजा करू लागला तर दलित समाजाची काय प्रतिक्रिया असेल? चित्रपटातील पात्राला ईद साजरी करताना दसऱ्यालाही आवर्जून हजेरी लावावी लागते. आपल्या हिंदू बांधवांचे मन दुखू नये म्हणून कधीकधी शाकाहारीही बनावे लागते. दारूही प्यावी लागते आणि डिस्कोमध्ये नाचावेही लागते. दाढीही ठेवावी लागते आणि व्यभिचाराचे समर्थनही करावे लागते. याच बरोबर काही निर्धारित गोष्टी त्याला न चुकता कराव्या लागतात. त्याला आपल्या देशप्रेमाचे पुरावे द्यावे लागतात, त्याला राष्ट्रगीत पाठ असावे लागते, त्याच्या घराचे कोणीतरी सेनेत असावे लागते, त्याला देशासाठी प्राण देण्याची भाषा करावी लागते, त्याला घरी किंवा कार्यालयात एखाद्या राष्ट्रीय चारित्र्याचा फोटो असावा लागतो. म्हणजे या चित्रपटांच्या माध्यमातून एक ‘आदर्श मुस्लिम’ची जातीयवाद्यांना अभिप्रेत अशी प्रतिमा तयार करून देशातील मुस्लिम समाजाच्या माथ्यावर मारण्याचे काम केले जाते.
प्रत्यक्ष जीवनातही हीच कसरत:
याच कसरतीचा भाग म्हणून शाहरुख खानला घरी देवघराची स्थापना करावी लागते तर सलमानला डोक्यावर गणपती मिरवावा लागतो. याच कसरतीचा भाग म्हणून युसुफ खानला ‘दिलीप कुमार’ बनून वावरावे लागते. व्यावहारिक जीवनात असंख्य मुस्लिमांना मुस्लिम असताना 'समाजाचा भाग नसलेला मुस्लिम' म्हणून वावरावे लागते. मुस्लिम प्रश्नांवर चर्चा करण्यापूर्वी देशाच्या प्रश्नांवर चर्चा करावी लागते. मुस्लिमांच्या समस्या मांडण्यापूर्वी विशेष भर देऊन सांगावे लागते कि ‘मी भारतीय या नात्याने चर्चा करतोय!’ मला साचेबद्ध मुस्लिम समजू नका अशा भारीभरकम वाक्यांचा प्रयोग करावा लागतो. मी इतर मुस्लिमांपेक्षा कसा वेगळं आहे हे दाखवावे लागते.
मुस्लिम समाजाची ही दैना अवस्था दोन शब्दांत मांडायची असेल तर इतकेच म्हणणे पुरेसे आहे कि मुस्लिम व्यक्ती ‘वैचारिक गुलामी’ चे आयुष्य कंठीत आहे. मुस्लिम समाजाची स्थिती बदलावी असे वाटत असेल तर सुरुवात मी मुस्लिम म्हणूनच होणे गरजेचे आहे. स्वतःला मुस्लिम म्हणून व्यक्त होणे गरजेचे आहे. मुस्लिम असण्याचा मूल्यांशी निष्ठा राखणे महत्वाचे आहे. मुस्लिम असणे म्हणजे इतरांचे विरोधक असणे असा अजिबात होत नाही, हे समाजाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत त्यांना मुस्लिम असणारे 'मुस्लिम' व्यक्त होताना दिसणार नाहीत.

खुप मस्त . मुसलमानानी परिवर्तन वादी होण्यासाठी खुपच कमी जण प्रयत्न करत आहे . त्याना योग्य मार्गावर लावण्यासाठी चळवळ अस्तित्वातत नाही
जवाब देंहटाएं