मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या जालना जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने. पूर्वतयारीचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या जालना जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने. पूर्वतयारीचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या जालना जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने.

पूर्वतयारीचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा.


 जालना, दि. 1 – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 4 मे, 2018 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेऊन योग्य त्या सुचना केल्या.
 यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, तहसिलदार बीपीन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई, ही देशातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेचे उपकेंद्र (रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय) जालना येथे होत आहे.  जालना जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब भूषणावह असुन या माध्यमातुन जिल्ह्यासह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेता येणार आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातुन शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडल्यास देश, विदेशामध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.  मौजे शिरसवाडी, येथील गट नं.132 मधील 200 एकर शासकीय जमिनीवर या विद्यालयाची उभारणी करण्यात येणार असुन यासाठी जवळपास 400 कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे.  विद्यापीठाच्या ईमारत उभारणीसाठी 2 वर्षाचा कालावधी लागणार असुन तोपर्यंत भाड्याच्या जागेत विद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
 मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा.  कार्यक्रमस्थळाची स्वच्छता करण्याबरोबरच शहरातील रस्त्यांची डागडुजी करुन घेण्यात यावी.  तसेच पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हेलिपॅडचीही उभारणी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
*******

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें