रमजानमध्ये मुस्लीम समुदाय सर्वात जास्त अन्न खातो असा गैरसमज अजूनही आहे.
मुळात जेवणाची क्रिया दिवसातून नेहमीप्रमाणे दोनच वेळा होते. फक्त त्याच्या वेळा बदलल्या जातात. त्यामुळे जास्त खातात या तर्काला कुठलाच आधार नाही.
ढोबळमानाने विचार केला तर पहाटे गाढ झोपेतून उठल्यानं कमी प्रमाणात अन्न पोटात जातं. तर संध्याकाळी थोडसं जास्त, 'पर जितना खुराक उतनाही' अन्न पोटात मावणार ना! जास्त कदापि नाही.
पण ही गोष्ट खरी आहे की रमज़ानमध्ये खाद्य वस्तू खरेदी-विक्रीचा खप तिप्पटीनं वाढतो. याला अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे फळे आणि मांसाहार खाण्यानं दिवसभर एनर्जी टिकून राहते. त्यामुळे वरील दोन्ही वस्तू या महिन्यात जास्त खपतात. यासह भाजीपालादेखील तेवढ्याच प्रमाणात खपतो.
दुसरं कारण म्हणजे रमजान महिन्यात अन्नदानाला मोठं महत्त्व आहे. घरात शिजलेलं अन्न व आणलेली फळे ३० आणि ७० टक्क्यात विभागले जातात. ३० टक्के घरी वापरुन तब्बल ७० टक्के अन्नदान केलं जातं.
शेजारी-पाजारी, मित्रमंडळी, मस्जिद, मदरसे, मंदिर, लंगर, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी हे अन्न पाठवलं जातं. रमजान महिन्यात प्रामुख्यानं खजूर, तळलेली भजी व फळे इफ्तारसाठी वापरले जातात. मोहल्ल्यातील प्रत्येक मस्जिदीत प्रत्येक घरातून काही न काही अन्न जाते. हे अन्न मस्जिदमध्ये जमा होणारे नमाजी, प्रवासी व इतर लोकांच्या इफ्तारसाठी वापरले जाते. *मूळातच मुस्लिमात सर्वांत जास्त पैसा हा फक्त खाण्यावर खर्च केला जातो. मध्ययुगीन मुस्लीम राज्यकर्त्यांनी आणलेली खाद्य संस्कृती प्रामुख्यानं भारतीय मुस्लिमांनी जपली आहे. बिर्याणी, कोरमा, दालचा, चिकन हंडी, सीक कबाब, कन्टक्की, हारीस, हलीम, पराठा, फालूदा, शरबत, इत्यादी जीन्नस रमज़ानमध्ये मुख्य जेवणात दस्तरखानवर असतो.*
म्हणजे रमज़ान महिन्यात खैरात (दान) व खाण्यावर कमाईचा मोठा भाग खर्च केला जातो.
रमजानच काय तर इतर वेळीही अनेक खाद्यपदार्थ घरात शिजवली जातात. याचा अर्थ मुसलमान फक्त 'बिर्याणी' व 'गोश्त'च खातात असं नाही, आमच्याही घरी, ज्वारी बाजरीची भाकर, पिठलं, वरण, भात, पालेभाज्या करतात बरं का!
रमजान महिन्यात खाद्यवस्तू शिजवण्याची पद्धत फक्त जराशी विस्तारते. मुस्लिमांत जेवढा मांसाहार केला जातो, त्यापेक्षा जास्त शाकाहाराला प्राधान्य दिलं जातं. सहर आणि इफ्तारवेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरात एकाच दस्तरखानवर बसतात. पूर्ण कुटुंब एका पंगतीत सामूहिक जेवणाचा आनंद घेतात. बच्चे कंपनी-महिला-पुरुष-बुजुर्ग एकत्रच जेवतात. रमजानमध्ये ही विधी प्रकर्षानं पाळला जातो. परगावी असलेलं सर्वजण रमज़ानमध्ये घरी जमतात. या महिन्यात कुटुंबात सर्वांचा सहवास लाभतो. यामुळे साहजिकच नातेसंबध दृढ होतात, वातावरण हलकं व्हायला मदत होते. आरोग्य सुधारते, मानसिक समाधान लाभते.
रमजान महिन्यात दररोज मित्रमंडळी व गरीब वंचितांना घरी बोलावून इफ्तार करवला जातो. मुस्लीमच नव्हे तर प्रत्येक जाति-धर्मातील लोकांना घरी बोलावून अन्न भरवलं जातं. थोडक्यात काय तर कुठल्याही परिस्थितीत अन्नदान करण्याची संधी सोडली जात नाही. हॉटेल व खानावळीत इफ्तार पार्टी आयोजन केलं जातं. रमजानमध्ये हॉटेलिंगही वाढतं. रस्त्यावर सामूहिक पंगती सजवल्या जातात, अशा एकूण सर्व प्रकरणामुळे साहजिकच अन्न व खाद्यवस्तूंची खरेदी-विक्री वाढते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें