ब्रम्हवाकडीचा लाचखोर सरपंचपती ऐसीबीच्या जाळ्यात.
सेलू :- निर्मल ग्राम योजने अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे 12 हजार रुपये लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी दिड हजार रुपयाची लाच घेताना सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडीच्या सरपंचपतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ता. 2 एप्रिल रोजी रंगेहाथ अटक केली.
नानासाहेब ऊत्तमराव वनवे असे या लाचखोर सरपंचपतीचे नाव आहे. ब्रम्हवाकडीचे सरपंच पद महिला आरक्षित असल्याने तेथे सविता वनवे ह्या सरपंचपदी विराजमान आहेत. मात्र त्यांचे पतीच गावचा कारभार हाकतात. महिला सरपंच ह्या फक्त नामधारीच आहेत. ब्रम्हवाकडी येथील रहिवासी तक्रारदार तातेराव कदम यांचे निर्मल ग्राम योजने अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे 12 हजार रुपये बिल मिळवून देण्यासाठी सरपंचपतीने दोन हजाराची लाच मागितली होती. पैशे दिल्या शिवाय शौचालयाचे अनुदान मिळणार नाही व तक्रारदाराची परिस्थिती गरीब असल्याने दिड हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर संबंधित विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून सोमवारी 2 एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथील जिंतूर नाका परिसरातील एका चहाच्या हाॅटेलवर सापळा रचून तक्रारदाराकडून दिड हजार रुपये घेताना सरपंचपती नानासाहेब वनवे याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एन. एन. बेंबडे, विवेकानंद भारती, लक्ष्मण मुरकुटे, अनिल कटारे, मानिकराव चट्टे, सारिका टेहरे यांच्या पथकाने केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें