नीरव मोदी, चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट.
नवी दिल्लीपंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींहून जास्त रुपयांना फसवणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. सीबीआयने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना चौकशीत सहकार्य करण्याबाबत ई-मेल केले होते. मात्र, व्यापार तसेच आरोग्यविषयक समस्यांमुळे सीबीआयला सहकार्य करणार नसल्याचे या दोघांनी सांगितले. येत्या काळात या दोघांना शोधण्यासाठी सीबीआय रेड कॉर्नर नोटीसही बजावू शकते. दरम्यान, अलाहाबाद बँकेच्या हाँगकाँग शाखेच्या विदेश चलन विनिमय पाहणाऱ्या अधिकाऱ्यालाही सीबीआयने समन्स बजावले आहे.
सहा महिन्यांत 'पीएनबी' सावरेल
नीरव मोदी याच्यासह त्याच्या सहभागीदारांनी केलेल्या ११ हजार कोटींच्या घोटाळय़ातून सहा महिन्यांत बँक सावरेल, असा विश्वास पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी व्यक्त केला. जे झाले ते आता भूतकाळ आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात मिळवण्यासाठी योग्य ती शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यांत आम्ही त्यातून बाहेर पडू. आमच्यावर ग्राहकांचा असलेला विश्वास कायम असून मुदतठेवीत ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या घोटाळय़ानंतरही ग्राहकांचा आमच्यावरचा विश्वास कायम आहे, असेही मेहता म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें