समाधान शिबिराच्या आयोजनातून परभणी जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला -ना.बबनराव लोणीकर.
परभणी, दि.15 :- समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून ही कामगिरी उल्लेखनिय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी केले.
समाधान शिबिराच्या उपक्रमाच्या सोनपेठ तालुक्यातील अंमलबजावणीचा आढावा ना.बबनराव लोणीकर यांनी सोनपेठ येथील तहसील कार्यालयातील आयोजित बैठकीत घेतला.यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर,अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे,उपविभागीय अधिकारी कोकणी, गणेशराव रोकडे आदि मान्यवर उपस्थित होते.
समाधान शिबिराची उपयोगिता स्पष्ट करुन ना.लोणीकर पुढे म्हणाले की, समाधान शिबिरात सर्व विभागाच्या ग्रामपातळीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. सामाजिक दृष्टीकोनातून हे काम अत्यंत गौरवपूर्ण आहे. गोरगरिब जनतेला सेवा देण्याचे काम या माध्यमातून झाले. येत्या काळात आणखी उरलेल्या लाभार्थ्यांना लाभ देवून आपली तालुक्याची कामगिरी अधिक वाढविण्याची संधी आहे. यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे सांगून त्यांनी राज्यातील हागणदारीमुक्त जिल्ह्याच्या कामगिरीची माहिती दिली.
मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समाधान शिबिराच्या समारोप समारंभाची माहिती देवून ना.लोणीकर यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन केले.
अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे म्हणाले की,शासननिर्णयानूसार जिल्ह्यातील 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 230 समाधान शिबिरांचे आयोजन करुन लाखो लाभार्थ्यांना लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. विविध योजनांचा योग्य लाभार्थी शोधण्याचे व गरजूंना लाभ देण्याचे काम शिबिराच्या माध्यमातून झाले आहे.शासकीय यंत्रणांनी सामाजिक दृष्टीकोनातून शिबिराचा उपक्रम राबविला आहे. सोनपेठ तालुक्यानेही चांगले काम केले असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करुन तहसीलदार जीवराज डापकर यांनी समाधान शिबिरातील कामगिरीचे सादरीकरण केले. या बैठकीस सर्व जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें