बिड=दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर सतत सहा वर्ष बलात्कार.
बीड - आई-वडील शेतमजूर असल्याने त्यांच्या मुलीचे पालकत्व स्वीकारलेल्या एकाने त्याच मुलीवर मागील सहा वर्षापासून सतत अत्याचार करून अखेर तिला विषारी औषध पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या नराधमाच्या ताब्यातून कसेबसे स्वतःच्या आई-वडिलांना त्याच्या कुकर्माची माहिती दिल्यानंतर मुलीची नरक यातनातून सुटका झाल्याची घटना बीड तालुक्यात घडली.
सध्या २१ वर्षे वय असणारी पिडीता युवती मूळची केज तालुक्यातील आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार तिचे आई-वडील ऊसतोड कामगार असल्याने ते वर्षातून केवळ चार-पाच महिनेच गावाकडे असतात. २०१२ साली अल्पवयीन असलेल्या सदर पिडीतेची तब्येत खराब झाल्याने आईवडिलांनी तिला दासखेड येथील एका महाराजाकडे घेऊन गेले. तिथे त्यांची ओळख विजय साधुजी वीर उर्फ शेटजी (वय ५५) याच्यासोबत झाली. त्यानेच पिडीतेवर उपचार केले आणि सव्वा महिना तिथेच राहावे लागेल असे सांगितले. त्या सव्वा महिन्यात पिडीतेच्या कुटुंबाची विजय वीर सोबत चांगली ओळख झाली. त्यांनतर तिच्या आई-वडिलांना उसतोडणी साठी जावे लागत असल्याने आणि तिला सांभाळण्यासाठी घरी कोणीच नव्हते हि परिस्थिती हेरून विजय वीर याने पुढे येत ‘तुमच्या मुलीला मी स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळतो, तिला माझ्याजवळ ठेवा’ असा म्हणत पिडीतेला दत्तक घेतले आणि स्वतःच्या गावी म्हणजेच बीड तालुक्यातील कर्झणीला घेऊन आला.
तिथे आल्यानंतर १५ दिवसातच त्याने पिडीतेला जीपमध्ये स्वतः सोबत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर विजयने पिडीतेचे केस कापले आणि तिला घालण्यासाठी शर्ट, पँट आणि मुलांसारखे बूट दिले. तिचा वेष मुलासारखा करून तो तिला निर्धास्तपणे कुठेही घेऊन जाऊ लागला आणि वारंवार अत्याचार करू लागला. २०१३ साली पिडीता गर्भवती राहिली असता विजयने औषधीच्या साह्याने तिचा गर्भपात केला. त्यानंतर प्रत्येकवेळी अत्याचार करताना तो तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊ लागला, नकार दिल्यास तिला काठीने मारहाण करत असे. नांदेड, शिवदरा, कपिलधार, जेजुरी, शिर्डी अश्या देवस्थानी घेऊन जाऊन तिथे किरायाने खोली करून तो पिडीतेवर अत्याचार करत असे. त्यानंतर तो पिडीतेसोबत लग्न करतो म्हणू लागला, परंतु, तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात मला लग्न नाही करायचे, मला माझ्या आई वडिलाकडे जाऊ द्या अशी विनंती पिडीतेने वारंवार केली. तिचे आईवडील भेटण्यासाठी आली तरी तो १० मिनिटाच्या वर बोलू द्यायचा नाही आणि समोरच थांबायचा. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या आई-वडिलांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करीन, त्यांना आणि तुला मारून टाकीन अशी धमकी द्यायचा.
दि. १६ एप्रिल २०१८ रोजी विजय आणि त्याची पत्नी नंदा हिच्याकडे आईवडिलांकडे जाऊ देण्याबाबत विनंती केली. यातून त्यांच्या वाद झाला. तेंव्हा वीर दांपत्याने तिला मारहाण केली आणि जबरदस्तीने विषारी औषध पाजले. पिडीतेने ताबडतोब लिंबाचा पाला खाल्ल्याने तिला उलट्या झाल्या आणि विष बाहेर पडले. त्याच दिवसही रात्री वीर दांपत्य झोपल्यानंतर तिने गुपचूप त्याच्या मोबाईलवरून आई वडिलाना फोन केला आणि झाला प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बीड पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने कर्झणी येथे दाखल झाली आणि त्यांनी पिडीतेची नरक यातनातून सुटका केली आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असे पिडीतेने फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें