नांदेड पोलीस भरतीमध्ये महा घोटाळा, १२ जणांना अटक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 26 अप्रैल 2018

नांदेड पोलीस भरतीमध्ये महा घोटाळा, १२ जणांना अटक.

नांदेड पोलीस भरतीमध्ये महा घोटाळा, १२ जणांना अटक.


नांदेड. प्रतिनिधी.
पोलीस शिपाई भरतीमध्ये उमेदवाराच्या लेखी परीक्षेत आर्थिक लोभापायी १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण देवून उत्तीर्ण करणाऱ्या प्रकरणाचा नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पर्दाफाश केला आहे. परीक्षा पद्धतीचे आयोजन करणाऱ्या सांगलीच्या कंपनीतील दोन जणांना व पुण्याच्या एकाचा यात समावेश असून, एकूण २० जणांविरुद्ध नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी बारा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशाच पध्दतीने राज्यात आणखी चार ठिकाणी हीच पद्धत अवलंबल्याची शंका जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी व्यक्त केली असून त्याबाबतचा अहवाल संबंधितांना पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पर्दाफाश केला. नांदेड जिल्ह्यात ६९ पोलिसांच्या भरतीसाठी गेल्या महिनाभरापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १ हजार ९८ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पंधरा दिवसापूर्वीच पार पडली. मात्र यातील १३ जणांना ९० ते ९४ पर्यंत गुण प्राप्त झाल्याने थोडीशी शंका निर्माण झाली. वास्तविक ही परीक्षा घेताना प्रश्नपत्रिकाही ताब्यात घेतली जाते. या प्रश्नपत्रिकेवर गणिताचे प्रश्न सोडवताना कुठलेही आकडेवारी वा गणिते तयार केल्याची खूण नव्हती. सरसकट प्रश्नाची उत्तरे कुठलेही कॅलक्युलेशन किंवा आकडेमोड न करता उत्तरे देण्यात आल्याने या शंकेला आणखीनच वाव मिळाला. या प्रकरणात तेरा परीक्षार्थींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विचारण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली त्या एस.एस.जी.सॉफ्टवेअर (सांगली) यांच्या चालकामार्फत संभाजीनगर येथील राहणारा आयआरबीतील पोलीस कर्मचारी नामदेव ढाकणे आणि राज्य राखीव दल ग्रुप क्र.३ जालना येथील पोलीस कर्मचारी शुक्राचार्य बबन टेकाळे यांनी मैदानी परीक्षा पास झालेल्या काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून तुमची लेखी परीक्षा पास करण्याची माझ्याकडे आयडीया आहे. यासाठी तुम्हाला साडेसात लाख रुपये मोजावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार काही विद्यार्थी तयार झाले आणि या सर्वांनी मिळून २५ लाख रुपये रक्कम या दोघांकडे दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा

ढाकणे आणि टेकाळे यांनी सांगलीच्या संबंधित कंपनीशी संपर्क साधला. तसेच ओएमआर या कंपनीचा चालक प्रविण भाटकर पुणे याच्याशी संवाद साधून नियोजन केले. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी कोऱ्या प्रश्नपत्रिका सोडल्या तर काहींनी वेगवेगळी उत्तरे देवून आपला पेपर सोडला. यातील काहींच्या उत्तरपत्रिका बदलण्यात आल्या. यातील तेरा विद्यार्थ्यांना ९० ते ९४ गुण मिळाल्यानंतर शंकेला वाव आला. या सर्व परीक्षा सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाल्या होत्या. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर यातील काही विद्यार्थी पेपर न सोडवता नुसतेच बसले होते तर काहींनी उत्तरे लिहिली होती. गणिताची उत्तरे देताना प्रश्नपत्रिकेवर कुठेतरी आकडेमोड करायला हवी होती, त्याची उत्तरे रास्त देण्यात आल्याने या शंका आणखीनच वाढत गेल्या. या सर्वांची उलट तपासणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या संदर्भात वजिराबाद पोलीस ठाण्यात वीस जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षापासून हिच कंपनी नांदेडला परीक्षा घेत असून, यामुळे मागच्या परीक्षेसंदर्भात देखील शंका निर्माण होऊ लागली आहे. या मंडळींनी असाच प्रकार राज्यातील आणखी चार ते पाच ठिकाणी केल्याची शंका पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली असून, त्याचीही सखोल चौकशी सुरू आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनीही या प्रकरणी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. सदरचा तपास स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपी कर्मचाऱ्यांची नावे –
१) नामदेव बाबुराव ढाकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल (संभाजीनगर)
२)शुक्राचार्य बबन टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ (जालना)
३)शेख आगा
४)शिरीष अवधुद (मे. एसएसजी सॉफ्टवेअर, सांगली)
५)स्वप्निल दिलीप साळुंके (मे. एसएसजी सॉफ्टवेअर, सांगली)
६)प्रविण भाटकर, ओएमआर ऑपरेटर, पुणे
७)दिनेश गजभारे

आरोपी उमेदवारांची नावे –
१)ओंकार संजय गुरव, २)कृष्ण काशिनाथ जाधव, ३)शिवाजी श्रीकृष्ण चेके, ४)कैलास काठोडे, ५)आकाश दिलीप वाघमारे, ६)सलीम महम्मद शेख, ७)समाधान सुखदेव मस्के, ८)किरण आप्पा मस्के, ९)सुमित दिनकर शिंदे, १०)मुखीद मकसूद अब्दुल, ११)हनुमान मदन भिसाडे, १२)रामदास माधवराव भालेराव, १३)संतोष माधवराव तनपुरे

एकंदरच राज्याच्या गृहविभागाला काळीमा फासणारी ही घटना आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें