आंबेडकरी चळवळीची “अस्मिता” काळाच्या पडद्याआड. जेष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन.
वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
राजेश खेडकर.(सोनपेठ)पंढरपूर:- मराठीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक, समीक्षक आणि पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दलित चळवळीतील अस्मितादर्श या प्रसिद्ध त्रैमासिकाचे ते जनक होते.
डॉ. गंगाधर विठोबाजी पाणतावणे हे मूळचे विदर्भातले. २८ जून १९३७ साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९५६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी.ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करू लागले.
लहान वयातच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. त्याकाळी ते ‘प्रतिष्ठान’ नियतकालिकातून लेखन करीत. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेच लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने आहे. त्यापैकी ‘धम्मचर्चा’, ‘मूल्यवेध’ , ‘मूकनायक’, ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’, ‘वादळाचे वंशज’, ‘दलित वैचारिक वाङमय’, ‘किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड’, ‘साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती’, ‘साहित्य शोध आणि संवाद’ हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समिक्षात्मक आहेत.
‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. दलित चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिक म्हणून ‘अस्मितादर्श’कडे पाहिले जाते.
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले. त्यांना आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून त्यात २०१८ सालच्या पद्मश्री पुरस्काराचाही समावेश आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें