परभणी : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद तर्फे आयोजित ग्रंथोत्सवावातील कवी संमेलन संपन्न .
बाईपणाचं जगणं विस्तवाशी सोईरपण
समशेर खान.परभणी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शनिवार दि.२४ रोजी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आयोजित ग्रंथोत्सवात निमंत्रित कवींच्या बहारदार कवितांनी रसिकांना भारावून टाकले.
नांदेड येथील कवी श्रीनिवास मस्के यांनी आपल्या 'बाईपणाचं जगणं' या कवितेत स्त्रियांची व्यथा समर्पकपणे मांडली ते लिहितात,
तिच्या काळजाला भेग
दिस कुठंनाबी रेघ
बाईपणाचं जगणं
विस्तवाशी सोईरपण
तर कवी अमृत तेलंग यांनी बदललेल्या गावच चिञ साकारतांनाच आपल्या कवितेतून प्रश्न विचारला. ते म्हणतात,
हौसनं खेळायचे
नदी पाञात पाणी
तसं तोंडचे पाणी नेलं पळवून
अन् चट् माळच नेला भरून बघताबघता
शहराची खाई
अजून कशी भरली नाही ?
कवी अण्णा जगताप यांनी सादर केलेल्या 'गारा' या विषयावरील तुकड्यातून शेतकरी साहत असलेल्या आस्मानी सुलतानीच्या धगीच्या जाणीवाने अवघे सभागृह अंतर्मुख झाले. ते म्हणतात,
एका गारीच्या झपक्याने
झाडाचा खोपा तुटला
चिमणी होती अंड्यावर
अर्ध्यावर संसार फुटला
दुसय्रा तुकड्यात ते म्हणतात,
गारांनी शिवार
गारेगार केलं
उभ्या रानावरून
वारं गेलं
तर ते तिसय्रा तुकड्यात म्हणतात
एक गार तिच्या
कपाळावर येऊन आदळली
तीचे कुंकू वाहून गेले कायमचे
काळे गोंदन मागे ठेऊन
या काव्य मैफलीत विविध भावनांचे रंग सर्व कवी आपल्या उत्तम सादरीकरणाने भरत असतांनाच कवी अविनाश भारती यांनी संत तुकारामावर सादर केलेली कविता दाद घेऊन गेली. जयश्री सोन्नेकर यांनी मुलगी सर्व दृष्टीने समर्थ असल्याचे आपल्या कवितेतून सांगितले त्या म्हणतात,
मायबापाची राखन
उभ्या जन्माची करीन
लेक नावाला परी मी
ल्योक बनून राहिल
कवी सुरेश हिवाळे यांनी आपल्या 'जीवन' या कवितेतून जीवनातील सुखाच्या क्षणभंगुरतेवर भाष्य करतांनाच नाती जपणाचा आणि मनातील सर्व ईगो दूर करण्याचा संदेश दिला. ते म्हणतात,
जपायची असतात ऋणानुबंध
माणसं जोडायची असतात
माणसांना माणसांपासून
दूर करणारी पाश आपणच तोडायची असतात
या कवी संमेलनात उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विठ्ठल भुसारे यांनी वामनदादा कर्डक यांची कविता सादर केली. सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विठ्ठल भुसारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक बी.आर.कुंडगिर, शिक्षणाधिकारी प्राथमिक आशा गरूड,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक नासेर खान,नवनाथ जाधव,सुभाष ढगे यांनी परिश्रम घेतले.
परभणी : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद तर्फे आयोजित ग्रंथोत्सवावातील कवी संमेलनात कविता सादर करतांना अमृत तेलंग मंचावर श्रीनिवास मस्के,अण्णा जगताप,अविनाश भारती,सुरेश हिवाळे,जयश्री सोन्नेकर

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें