ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश.
गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीररीत्या ऑनलाइन पद्धतीने विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिलेआहेत. यासोबतच ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या काही संकेतस्थळांवरही कारवाई करण्याच्या सूचना औषध निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.ऑनलाइन औषध विक्रीला बंदी असूनही काही संकेतस्थळांवरून औषधांची विक्री केली जात आहे. यामध्ये गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीररीत्या विक्री होत असल्याचे वृत्त लोकसत्ताने (20 मार्च )काही दिवसांपुर्वीच दिले होते. ‘गर्भपाताच्या गोळ्यांची ऑनलाइन सर्रास विक्री’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीरपणे दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने यामध्ये दोषी आढळेल्या संकेतस्थळावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासोबतच अन्य ऑनलाइन औषधांची विक्री करणाऱ्या संस्थांवरही कारवाई करण्याची पावले उचलली आहेत. ऑनलाइन औषध विक्रीचे प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून राज्यभरात सुरू झाले असून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे, बनावट डिजिटल प्रिस्क्रिप्शन बनविणे असे गैरप्रकार वाढत आहेत. यातील बहुतांश संकेतस्थळे बाहेरील राज्यातील असल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे अडचणीचे होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.ऑनलाइन पद्धतीने मागवली जाणारी औषधे कोठून आणली जातात याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने यामध्ये बनावट, मुदतबाह्य़, विनापरवाना उत्पादित केलेली किंवा भेसळयुक्त औषधे दिली जाऊ शकतात. तेव्हा अशा प्रकारच्या संकेतस्थळांवरील औषधांमुळे होणार थोडासा फायदा आरोग्याला घातक ठरू शकतो. तेव्हा नागरिकांनी ऑनलाइन औषध खरेदी करू नये असे आवाहनहीअन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें