बीडकरांची प्रतिक्षा संपली ; खा. प्रितमताईंच्या हस्ते 29 मार्च रोजी पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन =सलिम जहागीर
बीड ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हावासीयांच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचा असलेला पासपोर्ट कार्यालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले असून गुरुवार दि. 29 मार्च रोजी बीड येथील पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन खा. प्रितमताईंच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजप नेते तथा जिल्हा विकास सनियंत्रण दिशा समितीचे सदस्य सलीम जहाँगिर यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुणे , मुंबई येथे जावे लागत होते. एका कामासाठी वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने ही बाब अंत्यत खर्चिक झाली होती. शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. त्यामुळे बीडलाच पासपोर्ट कार्यलय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात लक्ष घातले. भाजप नेते सलिम जहाँगिर यांनीही हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम समाजातील नागरिकांना पासपोर्टसाठी सातत्याने मुंबईला जावे लागत असल्याने त्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत तसेच विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत असल्याची बाब खा. प्रितमताई यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार खा. प्रितमताई मुंडे यांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करून पासपोर्ट कार्यालय बीडला करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या. औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालयाशी संबधित अधिकाऱ्यांनी बीड येथे येवून बशीरगंज भागातील पोस्ट कार्यालयातील जागेची पाहणी करून त्यासाठी आवश्यक सुविधांची माहिती घेतली. अखेर सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर बीड येथील पासपोर्ट कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागला असून दि. 29 मार्च रोजी खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते पोस्ट कार्यलयाच्या आवारात पासपोर्ट कार्यलयाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे भाजप नेते तथा जिल्हा विकास सनियंत्रण दिशा समितीचे सदस्य सलीम जहाँगिर यांनी म्हटले असून हा प्रश्न मार्गी लागल्याने जिल्हावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें