गंगाखेड तालुक्यासाठी तीन वर्षात 690 कोटींचा निधी - ना. बबनराव लोणीकर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

गंगाखेड तालुक्यासाठी तीन वर्षात 690 कोटींचा निधी - ना. बबनराव लोणीकर

गंगाखेड तालुक्यासाठी तीन वर्षात 690 कोटींचा निधी - ना. बबनराव लोणीकर 


समाधान शिबीर पुर्वतयारी बैठकीत विविध लाभार्थ्यांना लाभाचे वाटप 


गंगाखेड  - गेल्या तीन वर्षांच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 690 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला असून आणखी काही कामे प्रस्तावित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लवकरच परभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या विविध विकास कामाचे ई- भूमिपूजन होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. 
येथील पूजा मंगल कार्यालयात आयोजित समाधान शिबिराच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, युवा नेते राहुलभैय्या लोणीकर, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सवडे, विठ्ठल रबदाडे, डाँ. सुरेश कदम, रामप्रभू मुंडे, जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास मुंडे,डॉ. प्रफुल्ल पाटील,गणेशराव रोकडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
ना. लोणीकर आपल्या भाषणात म्हणाले की, समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक लाख अशा दोन लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. समाधान शिबीर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.  समाधान शिबिरातून गोरगरीब, तळागाळातील जनतेला एकाच ठिकाणी विविध कामांचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी ५ हजार ३०२ कोटी तर जालना जिल्ह्यात ६ हजार कोटींचा निधी मंजूर केला असून, त्यातील काही कामांचे भूमिपूजन लवकरच होणार आहे, असेही ना. लोणीकर म्हणाले. 
गंगाखेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गासाठी 274 कोटी ६३ लाख, नगर पालिका विविध विकास कामांसाठी 21 कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी 13 कोटी 52 लाख, जलयुक्त शिवार कामांसाठी 43 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 कोटी 74 लाख, सा. बा. अंतर्गत विविध कामांसाठी 19 कोटी, दुष्काळ अनुदान 63 कोटी 70 लाख, पीकविमा 118 कोटी, महावितरणची कामे 38 कोटी अशा विविध कामासाठी भरीव निधी दिला आहे. यावेळी ना. लोणीकर यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांना मंजुरीची प्रमाणपत्रे, उजवला गॅस योजनेच्या लाभार्थयांना गॅस व टाकी, बचत गटाच्या महिलांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश वाटप करण्यात आला. एकूण 77 लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत लाभाचे वाटप करण्यात आले. तसेच 12 बचत गटांच्या महिलांना प्रत्येकी एक लाखाच्या कर्जाचा धनादेश देण्यात आला. यावेळी सरपंच, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें