*स्वराज्याचे स्फुल्लींग शिवरायात रूजवणारी आदर्श राष्ट्रमाता म्हणजे जिजाऊ : जयश्री सोन्नेकर*
सेलू .(समशेर खान)
जीवनात आईला अनन्यसाधारण महत्व असून संस्काराचे बीजारोपण आईच करू शकते. हिंदवी स्वराज्याची धगधगती ज्योत छत्रपती शिवराय यांच्या मनात सातत्याने तेवत ठेवून स्वराज्याचे स्फुल्लींग शिवरायात रूजवणारी आदर्श राजमाता म्हणजे माता जिजाऊ होत असे प्रतिपादन साहित्यिका जयश्री सोन्नेकर यांनी केले.
येथील चिन्मय कोचिंग क्लासेस च्या प्रांगणात राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश कुलकर्णी,श्री.के.बा विद्यालय सेलू येथील उपक्रमशील शिक्षक व उत्कृष्ट वक्ते योगेश ढवारे ,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर स्वामी विवेकानंद शाळेत घेण्यात आलेल्या आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल तृप्ती धरणे व द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल क्षितीजा अंभुरे या दोन विद्यार्थीनिंचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना योगेश ढवारे म्हणाले की,शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, शिवरायांनी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान केले पण या दोघांमागे प्रेरणा होती ती जिजाऊंची. जिजाऊंनी दिलेली अनमोल शिकवण हिच खर्या अर्थाने स्वराज्य निर्माण करण्यासाठी पोषक ठरली असे ते म्हणाले. अटकेपार हिंदू धर्माची पताका फडफडत ठेवणारे स्वामी विवेकानंद हे निसिमत्याग,निस्पृह देशसेवा व निरलस सेवाव्रती होते.कर्तृत्व व नेतृत्व याची खरी परिभाषा म्हणजे विवेकानंद होय असे ते म्हणाले.या वेळी वेगवेगळे दाखले देत त्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य उजागर केले.खास मुलांच्या आग्रहास्तव त्यांनी सादर केलेल्या वा वा वा या स्वागत गीतावर सर्व मुलांनी ठेका धरला व वातावरण चैतन्यदायी बनले.
सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड म्हणाले की माणसाची उंची ही शरीराने नाही तर कर्माने मोजली पाहिजे. स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांचे विचार डोक्यात व मनात भिनले पाहिजेत तरच बलशाली राष्ट्र निर्माण होईल.
दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सेलू येथे महिलावरील अत्याचार तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्या म्हणून निवड झाल्याबद्दल जयश्री सोन्नेकर यांचा ग्रंथ भेट देवून विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कुलकर्णी तर सूत्रसंचलन शेळके मॅडम यांनी केले व आभार जाधव सरांनी मानले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें