म्हाळसापूरमध्ये कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या.
◾सेलू तालुक्यातील घटना.
सेलू :- शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरू असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीमुळे राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे गुरूवारी ता. 5 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आले. सुदाम बापुराव जाधव (वय 35 ) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मयत हा अल्पभूधारक शेतकरी होता. शेती पिकविण्यासाठी बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज काढले होते. मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे तर सोडाच पण दैनंदिन व्यवहार भागवणेही अशक्य होऊन बसले होते. म्हणून आपल्या मुलांबाळांना घेऊन नाशिक येथे पोट भरण्यासाठी गेला होता. गावाकडची दोन एकर शेती कोणालातरी ठोक्याने द्यावी या उद्देशाने तो गावाकडे आला होता. बुधवारी रात्री उशिरा जेवन करून स्वतःच्या राहत्या माळवदाच्या घरात झोपला होता. गुरुवारी सकाळी तो उठला कसा नाही म्हणून आईने दरवाजा वाजवला सकाळी दहा वाजले तरी दरवाजा उघडला नाही. म्हणून आईने शेजा-यांच्या मदतीने दरवाजा उघडला तर मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत माळवदाच्या आढूला लटकलेला दिसून आला. या घटनेचे वृत्त पोलिसांना समजताच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. कर्जाची परतफेड करता येत नसल्याने सुदाम जाधव यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें