भाजपचे मंत्री संभाजी निलंगेकरांवर बँका मेहरबान; ५१ कोटींच्या माफीची लॉटरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

भाजपचे मंत्री संभाजी निलंगेकरांवर बँका मेहरबान; ५१ कोटींच्या माफीची लॉटरी.

भाजपचे मंत्री संभाजी निलंगेकरांवर बँका मेहरबान; ५१ कोटींच्या माफीची लॉटरी.


नीरव मोदी प्रकरणातून प्रचंड बदनामी झाल्यानंतर भाजपचे कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना सीबीआयच्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी दोन बँका मेहरबान झाल्याचे भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक या दोन बँकांनी संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम मुद्दल आणि व्याजासह ७६ कोटी इतकी असताना अवघ्या २५ कोटी रुपयांत सेटलमेंट करून ही मदत केली आहे. या दोन्ही बँकांनी भाजपच्या मंत्र्यांना दिलेली ही तब्बल ५१ कोटी रुपयांची माफी वादळी ठरण्याची शक्यता आहे.

एका वृत्तवाहिनीने ही खळबळजनक माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या एकेका रुपयासाठी तगादा लावणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका मोठ्या उद्योगपती व राजकारण्यांसमोर कशा झुकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, संभाजी पाटील निलंगेकरांच्या मद्यार्क निर्मिती करणाऱ्या व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीला महाराष्ट्र बँक आणि युनियन बँकेने २००९ मध्ये प्रत्येकी २० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. दोन वर्षे या कर्जाच्या व्याजाची रक्कम निलंगेकर जामीनदार असलेल्या कंपनीने नियमित परत केली. पण २०११ पासून कंपनीने व्याज आणि मुद्दलाचे पैसे भरणे बंद केले. तेव्हा त्यांचे खाते एनपीएमध्ये गेले. दरम्यान, संभाजी पाटलांनी आपल्या आजोबांचीच जमीन त्यांना माहिती न देता बँकेकडे गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला तेव्हा बँकेने सीबीआयकडे फसवणुकीची तक्रार केली.

‘सीबीआय’ने संभाजी पाटील आणि कंपनीची चौकशी करून ३ हजार २७ पानांचे आरोपपत्र लातूरच्या न्यायालयात दाखल केले. त्यावर अजून सुनावणी झालेली नाही. मात्र, अशावेळी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक उदार झाली. त्यांनी मुद्दल कमी करून आणि व्याजमाफी देऊन वन टाईम सेटलमेंट केली. या सेलटमेंटनुसार ३१ मार्चपर्यंत १२ कोटी ७५ लाख भरून संपूर्ण बेबाकी देण्याची तयारी बँकेने दाखवली. अशी सूट देताना सीबीआयच्या प्रकरणात कोणतीही मदत होणार नाही, अशी अट जरी घातलेली असली तरी याचा ‘सीबीआय’च्या तावडीतून सुटण्यासाठी मदत होईल हे निश्चित.

महाराष्ट्र बँकेचे एकूण येणे २० कोटी ९ हजार रुपये आहे. त्यावरचे व्याज २१ कोटी ७५ हजार रुपये आहे. म्हणजे निलंगेकरांकडून एकूण ३९ कोटी ८६ लाख रुपये येणे बाकी असताना बँकेने संपूर्ण व्याज माफ केले. शिवाय मुद्दलात ८ कोटीची सूट दिली. म्हणजे आता फक्त १२ कोटी ७५ लाखाचीच परतफेड निलंगेकरांनी करायची आहे. युनियन बँकेचे खाते ३० जुलै २०११ ला एनपीएत आले.युनियन बँकेचे मुद्दल २० कोटी ५१ लाख आहे. त्यावर व्याज १६ कोटी ४० लाख रुपये आहे. एकूण वसुली ३७ कोटी ४ लाख आहे. इथेही बँकेने सगळे व्याज माफ केले. मुद्दलात ८ कोटींची सूट दिली. त्यामुळे आता ३७ कोटी ४ लाखांपैकी १२ कोटी ७५ लाख एवढीच रक्कम भरायची आहे. संभाजी पाटलांना दोन्ही बँकांचे मिळून ७६ कोटी ९० लाख एवढे देणे होते. त्यापैकी २५ कोटी ५० लाख रुपयांना दोन्ही खाती सेटल झाली. बँकांना मात्र, एकूण ५१ कोटी ४० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें