नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार, त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.
दिल्लीला लागूनच असलेल्या नोएडात दोन शिक्षकांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणाच्या तपासात हेळसांड केल्याप्रकरणी एका तपास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.ही विद्यार्थिनी नोएडातील सेक्टर-५२ जीबी येथे आपल्या कुटुंबासोबत राहते. येथील एलकॉन पब्लिक स्कूलमध्ये ती नववीच्या वर्गात शिकत होती. अभ्यासातही ती फार प्रगतीशील नव्हती. गेल्या वर्षी नववीत ती नापास झाली होती. यामुळे यावर्षी तिला पुन्हा नववीच्या वर्गात बसवण्यात आले होते.तिच्या दोन शिक्षकांची तिच्यावर वाईट नजर होती. अनेकवेळा ते तिच्याशी अंगलट करत. यास विरोध करताच ते विद्यार्थिनीला पुन्हा नापास करण्याची धमकी देत होते. यामुळे विद्यार्थीनी गुपचुप हा अन्याय सहन करत होती. तिला हे सर्व असहय्य झाले होते. तिने घरातही या शिक्षकांबदद्ल सांगितले होते. ते मला कधीही पास होऊ देणार नाहीत असे ती घरातल्यांना सांगायची. १६ मार्चला तिचा परिक्षेचा निकाल लागला. त्यात शिक्षकांनी तिला त्यांच्या विषयात नापास केले. यामुळे विद्यार्थीनी निराश होती.त्यानंतर मंगळवारी घरात एकटी असताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान तिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती का याचा तपास करण्यात येत आहे. तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाच्या तपासात टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें