सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलू तालुक्यातील सेलू ते धनेगाव हा शिवरस्ता केवळ रोजगार हमी योजनेतून मंजुरी मिळत नसल्याने रखडलेला आहे.मजुरांची कामाची मागणी असतांना केवळ अधिकारी प्रशासकीय मान्यता देत नसल्याने हा रस्ता गेल्या 3 वर्षापेक्षा जास्त काळापासून रखडत पडून शेतकऱ्यांचे रस्त्यायाभावी हाल होत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचे उदघाटन तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या हस्ते झाले होते.
सन 2015-216 या वर्षी शासनाच्या योजनेत कच्चे मातीकाम लोकसहभागातून करा त्याच्या मजबुतीकरण कामास शासन मान्यता देईल असे गाजर शेतकऱ्यांना दाखवण्यात आले होते.त्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून कच्चे मातीकाम केले आहे.जवळपास 2 की.मी.अंतर असलेल्या या रस्त्यावर शेतकऱ्यांनी पदरमोड करून खर्च केले.अतिक्रमण स्वतःहून काढले कारण प्रत्येकाला वाटले आता रस्ता होईल.या कच्चा मातीकामाचे उदघाटन तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल,तत्कालीन उपजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,तेव्हा आणि आताही असलेले तहसीलदार आसाराम छडीदार आदींच्या हस्ते करण्यात आले होते.त्यावेळी महिवाल यांनी या रस्त्याच्या मजबुतीकरण कामास तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन देखील दिले होते.या सर्व कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करून तांत्रिक मान्यता देऊन तालुकास्तरीय समितीकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला.परंतु तेंव्हापासून सेलू तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामेच मंजूर न केल्याने गेल्या 3 वर्षांपासून केवळ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे या सेलू धनेगाव रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत.त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन नवीन दरपत्रकानुसार सेलू धनेगाव रस्त्याचे अंदाजपत्रक सादर करण्याचे पत्र दिले आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.एन.कोरे हे अंदाजपत्रक सादर करीत नसल्याने आता हा रस्ता केवळ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे व रोजगार हमी योजना सुरू न केल्याने शेतकऱयांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे." माझ्याकडे माझ्याच विभागाचे कामे खूप आहेत.यामुळे मी पुन्हा रोजगार हमी योजनेची कामांची जबाबदारी का घेऊ? असे सरळ उत्तर दिले जात असल्याने अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारापुढे शेतकरी वैतागून गेला आहे.खुद्द उपविभागीय अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक सादर करण्याचे पत्र देऊनही कित्येक महिने लोटले आहेत.तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अंदाजपत्रक सादर करीत नाहीत. पावसाळ्यात तर या रस्त्याने पायी चालणेही मुश्किल होते.सध्या या रस्त्यावर काटेरी झुडुपे वाढली आहेत.जनावरांनाही चालताना त्रास होत आहे.शेतकऱ्यांनी अनेकवेळा मागणी,निवेदने देऊनही खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी उदघाटन केलेला रस्ता केवळ प्रशासकीय मान्यतेअभावी धूळ खात पडून राहिला आहे.सध्याची महसूल यंत्रणा देखील रोजगार हमी योजना राबवण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.यामुळे तातडीने या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करावे अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असतांना या योजनेवरील मजुरांना काम देखील मिळाले नाही.रोजगार हमी योजना सुरू केल्यास मजुरांच्या हातालाही काम लागेल.आणि शेतकऱ्यांची रस्त्याची मुख्य अडचण देखील दूर होईल.
तेव्हाही छडीदार,आताही छडीदार.सेलू- धनेगाव या शिवरस्त्याचे रोजगार हमी योजनेतून काम धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार म्हणून आसाराम छडीदार कार्यरत होते.आणि त्यावर त्यांची बदली होऊन पुन्हा ते सध्या सेलू येथे रुजू झाले आहेत.मात्र अजूनही त्यांच्या उपस्थितीत उदघाटन केलेले सेलू धनेगाव शिव रस्त्याचे काम साधे मंजूर देखील झालेले नाही.कामाची पूर्तता तर त्यापेक्षा लांब आहे.ही महसूल यंत्रणेच्या गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें