जागतीक पुस्तक दिना निमित्त प्रासंगीक. वाचनसंस्कृती रुजविण्याचा मार्ग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 अप्रैल 2018

जागतीक पुस्तक दिना निमित्त प्रासंगीक. वाचनसंस्कृती रुजविण्याचा मार्ग.

जागतीक पुस्तक दिना निमित्त प्रासंगीक.


वाचनसंस्कृती रुजविण्याचा मार्ग.


"वाचन माणसाला घडवतं
त्याच्या बुद्धीला, विचारांना
धार लावतं. माणसाच्या कक्षा
रुंदावत नेतं, त्यांचं क्षितिज विस्तारतं "

शाळेत नृत्य, नाट्य या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेणारे विद्यार्थी पुष्कळ सापडतात पण वक्तृत्व लेखन स्पर्धेसाठी मात्र विद्यार्थ्यांना घोड्यावर बसवावे लागते. असे का? तर वाचनाचा अभाव.

'वक्ता दशसहस्त्रेसु' असे म्हटलेच आहे पण कोणत्याही क्षेत्रात ठामपणे उभे राहायचे असेल तर, आपले म्हणणे मांडता येणे आवश्यक आहे. यासाठी लहान वयापासूनच मुलांना छोटी-छोटी पुस्तके देऊन वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. आईवडिलांनी मुलांना अभ्यासाचे, अभ्यासेतर असे वाचायला शिकवले पाहिजे. वाचन हे मनावर उत्तम संस्कार करत असते. चांगले कसे वागायचे, चांगले कसे जगायचे हे तर वाचनच शिकवत असते. वाचनाने जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.

“पहिले वाचन हे केवळ वाचन नसते
ती एका सेतूची निर्मिती असते."
   
       ज्ञाताला अज्ञाताशी जोडणारा सेतू, स्थानिक संस्कृतीला नवीन संस्कृतीशी जोडणारा आणि माणसाच्या आंतरिक जगाला बाह्यजगाशी जोडणारा सेतू.

वाचनाची गोडी लावायची तर वाचन यायला लागण्यापूर्वीच चित्रांची पुस्तकं मुलांच्या हाती खेळायला हवीत. "काही देशांत तर खेळण्यासारखे पुस्तक बनवतात. त्यांचे वेगवेगळे आकार असतात पुस्तक उघडलं की आतली चित्र उभे रहातात, पुढे येतात रंगवण्यासाठी चित्रांची पुस्तकं असतात. ही पुस्तकं लहानपणापासून हाताळतात तेव्हा,

'पुस्तक म्हणजे आनंद '

हा संस्कार होतो. आणि पुढे पुस्तकांचं प्रेम वाढतच राहतं"
       "वाचनसंस्कार" करताना फक्त आपण डोळसपणे काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मानवी जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा वाचन संस्कार हा खूप मौल्यवान संस्कार आहे. मुलांना पुस्तक वाचायला देताना, पुस्तकांच्या निवडीबाबत मात्र आपण काळजी घ्यायला हवी. प्रकाशक खूप आहेत, पुस्तकही खूप आहेत पण मोठा टाईप, रंगीत चित्र घातलं की चांगलं पुस्तक होत नाही. या गोष्टींची निवड बघावी लागते. त्यातून काही चुकीचे संदेश जात नाहीत ना हेही बघावं लागतं. साहित्य जर सकस व वाचनीय असेल दर निश्चित निखळ आनंद मुलांना/वाचकाला मिळतो. सुरुवातीला जे आवडेल ते पुस्तक देऊन वाचायची सवय लावायची. त्यानंतर योग्य ते मार्गदर्शन देऊन शिस्त लावायची. चांगली दर्जेदार, सकस पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचायचं काम आपण पालकांनी केला पाहिजे.

   “वाचनाची गोडी म्हणजे ठिबक सिंचनाचा प्रयोग असतो”

लहान वयापासून वाचनाची गोडी लागल्यानंतर मुलांना समाजातील चांगलं वाईटाची जाणीव होऊ लागते. नवीन नवीन पुस्तक वाचल्यानंतर नवीन नवीन पुस्तक वाचल्यानंतर निराशा वर मात करून नव्या आशेने नवीन स्वप्न पाहणे सुरू होते. नवीन संकल्प नवीन विचार नवीन स्वप्ने पाहणे सुरू होते. नव्या योजना मनात आकार घ्यायला लागतात; आणि त्या साकार करण्यासाठी प्रयत्नांची दिशा हि ठरायला लागते.  गांधीजी म्हणायचे, "सुंदर हस्ताक्षरे शिक्षण चांगलं झाल्याचं लक्षण आहे". तसेच "मुलांना वाचनाची गोडी लागणं हे चांगलं भाषाशिक्षण झाल्याचं लक्षण आहे. असं मला वाटतं." पुस्तक आणि वाचन हेच मनुष्याच्या गतीचा आणि प्रगतीचा आधार आहे म्हणून रोज किमान अर्धा तास तरी वाचनाकरिता राखून ठेवावा. पुस्तक वाचन हा एक उत्कृष्ट मानसिक व्यायाम आहे. यामुळे बुद्धीला सतत चालना मिळत राहते. "पुस्तकांच्या बेटात रमणारा माणूस आत्मक्लेश, वंचना, उपहासा पलीकडचे जीवन जगत असतो."
      "बाळा जगात खूप चांगली माणसे आहेत, आपणही त्यांचे ऋण मानले पाहिजेत. सुख दुःखात मदतीला धावून गेले पाहिजे …लहानथोरांशी आदराने वागले पाहिजे. आंधळ्या पांगळ्यांनी मदत केली पाहिजे. चांगल्याची संगत अन, वाईटापासून दूर राहावे. असे माणुसकीचा उदात्त दृष्टिकोन बाळगायला लावणारे वाक्य मुलांच्या वाचनातून गेले तर........"
               मुलं वेळ जावा म्हणून टीव्ही, गेम्स कार्टून्स यात अधिक गुंततात आणि खऱ्या आयुष्यापासून दुरावतात. चांगल्या-वाईटाचा विचार न करता भावनेच्या तीव्रतेचा हा वेग कुठेतरी नियंत्रित होणे गरजेचे आहे. आपल्या लहान लहान कळ्यांना फुलवायचे असेल तर वाचनसंस्कार महत्त्वाचे आहे. मुळात वाचनाची गोडी निर्माण झाली की, नेमकं काय वाचावे हे आपोआप कळते.
         वाचनाचे महत्त्व समजून प्रगती केलेल्या देशांमध्ये "फिनलंड" या देशाचे नाव अग्रस्थानी आहे. इथले ७५टक्के नागरिक नियमितपणे रोज वर्तमानपत्र वाचतात. या देशात एकूणच वाचन मोठ्या प्रमाणात केले जाते. ग्रंथालयाचा सर्वात जास्त वापर होणारा देश अशी या देशाची ओळख सांगता येईल. दरवर्षी इथले नागरिक सरासरी १७ पुस्तके वाचतात. असे निदर्शनात आले आहे . म्हणूनच शैक्षणिक दृष्ट्या जगात अग्रगण्य असलेल्या फिनलंडचे कौतुक वाटते.
        ग्रंथ, पुस्तक माणसाच्या ठायी महत्त्वाकांक्षा, अपेक्षा उत्पन्न करतात आणि त्यांच्या जगण्याला सन्मान मिळवून देतात. हे आपण जाणतो. वाचन आपले व्यक्तिमत्त्व फुलविणारा आणि आपल्याला ज्ञानी बनविणारा छंद आहे. शिक्षणात आपल्याला फिनलंड इतकी पातळी गाठायची असेल तर मुलांमध्ये वाचनाची गोडी लावावी लागेल.

वाचनाचे महत्त्व जाणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, “एक पोळी कमी खा, पण एक पुस्तक विकत घ्या, वाचाल तर वाचाल”. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर कळत-नकळत वाचनाचा छंद असलेल्या व्यक्तीला ग्रंथांमध्ये विशद  केलेले अनुभव दिशा दर्शवितात. विचारसरणीत बदल होतो. वाचनामुळे प्रश्न सुटतील असे नाही तर तोडगा काढण्याची पद्धती सापडू शकते.
   मन समृद्ध व्हावं, आपलं जग अधिक विस्तीर्ण व्हावं, आपलं कुतूहल पूर्ण भाग, या इच्छेने आपण आभ्यासाच्यापलीकडे जाऊन वेगवेगळी पुस्तके वाचायला हवीत. वाचनामुळे आपलं मन हळूहळू समृद्ध होत जातं. आपल्याला नाही कळतं ते इतरांना जाणवतं. पालक या नात्याने आपल्याला समजून घ्यावे लागेल की, "बुध्दीला मनाला समृद्ध करण्याचे वय म्हणजे बालवय!" याच वयात मनाला उथळ गोष्टी दाखवत राहिलात तर तीच उंची मुलांची होईल. केवळ रंजन आणि मनोरंजना साठी किती वेळ? एखाद्याला व्यायाम शाळेचे सभासदत्व ९० व्या वर्षी दिलं तर चालेल का? पहिलीच डंबेल्स उचलताना हार्ट अटॅक यायचा! ती चूक आपण करतो. अचानक वृद्धापकाळी वाचनाचा छंद लागू शकत नाही. ते रोप रुजविण्याचे बालपण हेच वय आहे. ते मनोरंजनाच्या सांडपाण्यात वाया घालवू नका. जगातील सगळी मोठी माणसे अचानक मोठी झालेली नाहीत. लहानपणी त्यांनी खूप वाचन केल, विविध प्रकारचे चौफेर वाचन केलं. त्यातूनच त्यांना कुणीतरी वेगळं व्हाव आशी प्रेरणा मिळाली.

आजकालची मुले वाचत नाहीत .... ही सार्वत्रिक तक्रार येते. परंतु खरा प्रश्न आहे तो मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? वाचक म्हणून मुलांचा विकास व्हावा यासाठी आपल्याकडे काही धोरण आहे का? असल्यास ते योग्य प्रकारे राबविली जाते ? का?
    जागतिक पातळीवर कीर्ती प्राप्त व्यक्ती ने वाचनाचे महत्त्व विशद केलेले असून ग्रंथवाचनाने मानवी मन संस्कारित होतं असे अनेक विचारवंतांनी सांगितले आहे. आज माणसाचे माणसावरील प्रेम कमी होण्याचे कारण आपण वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहोत हेच आहे.

जागतिक पातळीवर मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी काय प्रयत्न केले जातात हे आपण पाहिले असता......

१- 'अमेरिका' या देशांत बालवाचक घडविण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जातात. अक्षर ओळख झाल्यापासून मुलगा चांगले वाचायला लागेपर्यंतच्या तीन पातळ्या कल्पिल्या जातात.

पहिल्या पातळीवरची पुस्तके- तीन ते पाच वयोगटासाठी ची मोठी अक्षरे, मोठमोठी रंगीत चित्र असलेले व घट्ट बांधणीची व प्लास्टिक पानांची ही जेमतेम १४-१६ पृष्ठांची पुस्तके असतात.

दुसऱ्या पातळीवरील पुस्तके- साधारण पाच ते सात वयोगटासाठी असावीत. पुस्तकातही मोठी रंगीत चित्रे असतात. परंतु इथे अक्षरांचा आकार थोडा लहान होतो. ही पुस्तकं २०-२५पृष्ठांची असतात. प्रत्येक पानावर 3 पासून नऊपर्यंत वाक्य असतात. वाक्य व शब्द मोठे असतात. जाणीवपूर्वक नव्या नव्या शब्दांचा वापर केला जातो. ही पुस्तकं वाचता वाचता मुलांना वाचनाची  गोडी लागते.

तिसऱ्या पातळीवरील पुस्तकातून- वाक्यांची वेगवेगळे प्रकार परिचित करून दिले जातात. या पुस्तकातही चित्रे असतात पण लहान लहान असतात. पुस्तकांचा आकारही मोठा असतो.

अशा प्रकारच्या पुस्तकातून शिस्त, स्वच्छता एकमेकांच्या उपयोगी पडणे, वस्तू वाटून घेणे, सर्वांची काळजी घेणे. इत्यादी सामाजिक मूल्यांच्या संबंधी पुस्तके मुलांशी हितगुज करतात. व्यवहारातील जगाशी असलेला अनुबंध, अनेक व्यवसायात करावी लागणारी कामे, मनातील शोध असे अनेक विषय रंजकतेने मांडलेले असतात. कदाचित नव नवीन ज्ञान आत्मसात करण्याचे हे त्यांचे वय असते. इथेच बालवाचक आकाराला येऊ लागतात.

   सार्वजनिक वाचनालयातील बालवाङ्मय  विभाग खूपच मोठा असतो. दोन ते चार वयोगटातील मुलांसाठी ची पुस्तके व्हिडीओ सीडी सह असतात. याठिकाणी आजी-आजोबा सह अभिनय करून पुस्तक वाचन करून दाखवितात. मुलांना शाळेत दिलेले प्रकल्प सोडविण्यासाठीही ग्रंथालय मदत करतात. ग्रंथालयाचा आणखी एक उपक्रम मुलांना वाचण्यास प्रवृत्त करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत उपक्रम राबवला जातो. मुलांनी २० पुस्तके वाचली की त्यांचे पालक त्याचा तपशील ग्रंथालयास सादर करतात. मग त्या मुलाला चषक आणि प्रमाणपत्र मिळते. त्या प्रमाणपत्रावर ग्रंथालयाच्या सही बरोबरच गव्हर्नरची सही आणि राज्य ग्रंथपालाची सही असते.

    शाळेच्या ग्रंथालयासाठी प्रारंभी तिथे शिक्षण विभागाकडून भरघोस रक्कम दिली जाते. नंतर ग्रंथालय वाढविण्याची जबाबदारी मात्र शाळांची असते. वाचन कसे करायचे याचा वस्तुपाठ इतक्या लहान वयात करून दिला जातो. विद्यार्थ्यांची आकलन शक्तीला अजिबात कमी लेखले जात नाही. आणि ती अधिकाधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक वर्गासाठी आठवड्यातून एकदा पुस्तक बदलून देण्याचा वारअसणे एवढ्यापुरतेच शाळेच्या ग्रंथालयाचे काम सीमित नाही. ग्रंथालय मुलांना पुस्तक वाचनासोबत पुस्तकावर करता येण्याजोगी प्रकल्पाची एक यादी त्यांना देते. त्यातून कुठलाही एक प्रकल्प निवडून विद्यार्थी प्रकल्प करू शकतो. उदाहरणार्थ २६/११ च्या अमेरिकेतील हल्ल्यासंबंधी एखादे पुस्तक आहे तर कार्डबोर्डचे ट्विन टॉवर्स तयार करणे, याविषयीची माहिती जमा करणे, या बातमीनंतर प्रसिद्ध झालेले फोटो जमा करणे, या हल्ल्यात मारल्या गेलेल्या एखाद्या व्यक्तीचे तुम्ही आत्ता आहात अशी कल्पना करून मनोगत व्यक्त करणे, इत्यादी. किंवा एखाद्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करणे, असे मुलांच्या कल्पनाशक्तीला आव्हान करणारे कितीतरी विषय पुरविले जातात. यातूनच मुलांचे वाचन समृद्ध होते. त्यांना वाचनाची दृष्टी मिळत जाते.

बालवाचकाकडून बालसाहित्याचा गौरवही तर फारच भन्नाट कल्पना. मुलांनी वर्षभरात त्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांपैकी पुस्तके वाचली असतील त्यातील आपल्या आवडत्या पुस्तकांना एक, दोन, तीन क्रमांकाची मते द्यायची व ती ग्रंथालयात ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकायचे. पहिल्या क्रमांकाची मते ज्या पुस्तकाला सर्वाधिक मिळाले असतील त्या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड होते. म्हणजेच बालवाचकाला लिंबूटिंबू समजले न जाता जबाबदार वाचक मानले जाते.
        इथली पुस्तकांची दुकाने ही मुलांना वाचनाची गोडी लावण्यात हातभार लावतात. बाल विभागातल्या एखाद्या पुस्तकावर ते प्रश्नावली देतात. ती भरून द्यायची किंवा एखाद्या पुस्तकाविषयी तुम्हाला काय वाटते ते लिहून द्यायचे. मग त्या वाचकाला एक पुस्तक बक्षीस मिळते. किंवा त्याला त्याच्या आवडीचे पुस्तक घ्यायला गिफ्ट व्हाऊचर मिळते.

     अशाच प्रकारचे आपल्यादेशामध्ये अनेक ठिकाणी प्रयोग होतात. परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणात वाचनाकडे व शाळेतील ग्रंथालयाकडे लक्ष दिले जात नाही किंबहुना मुलांच्या वाचनाकडे ही लक्ष दिले जात नाही. परिणामतः आपली मुलं सुद्धा पुस्तकापासून दुरावली जात आहे. यासाठी माझ्या परिचयातील काही शाळा उद्याचे वाचे घडविण्यासाठी अत्यंत निष्ठापूर्वक कामाला लागली आहेत. या शाळेत राबविल्या जाणाऱ्या काही उपक्रमांची नावे उदाहरणादाखल या ठिकाणी नमूद करावीशी वाटतात. उद्याचे वाचक घडविण्यासाठी, अमृतकण, शिदोरी, लेखक आपल्या भेटीला, मला बोलु द्या, पत्रमैत्री, पेन मित्र, चला कविता करूया, पुस्तकांची समीक्षण, अभिवाचन, अमृतकण वाटूया, उत्कृष्ट वाचक पुरस्कार, बाल साहित्य संमेलन. इत्यादी अभिनव उपक्रमांद्वारे मुलांमध्ये वाचनाविषयी ची आवड निर्माण करण्याचे काम निष्ठापूर्वक केल्या जात आहे. अशा उपक्रमांद्वारे वाचन संस्कृती रुजविण्याची काम पाहताना मन अगदी भरून येतं. कारण अनेक ठिकाणी अनेक ग्रंथ या चिमुकल्या हातांची, त्यांच्या स्पर्शांची आतुरतेने वाट पाहत आहेत. ग्रंथ आणि या चिमुकल्या हातांची भेट घालून देण्याचं काम आपण करुया असं मनापासून वाटतं.

  आमच्या मुलांनी चांगले वाचक व्हावे. त्यांनी स्वतंत्र विचार करावा, त्यांची कल्पनाशक्ती भरावी यासाठी आपल्याला विचारपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील......
मित्रांनो समृद्ध रसिक माणूस होण्याची पात्रता निसर्गानी तुम्हाला दिलेली आहे ती वेळीच ओळखा आणि पुस्तकांचे पंख मनाला फुटू द्या. जवळचं वाचनालय, पुस्तकाचं दुकान तुम्हाला बोलवतय, ऐका त्या पुस्तकांची हाक!
                  ऐकाल ना?
                                    वाचाल ना?

               युवराज माने
yuvrajmane892@gmail.com ७५१७४७८५७०

1 टिप्पणी: