शिर्डी प्रतिनिधी.
बक्षिसाची रक्कम शाळेसाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक करण्यात आले.
धोंडपारगाव येथील जिल्हा परिषद शाळा दत्तवाडीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बौद्धिक व कलेच्या सामर्थ्यावर मिळविलेली बक्षिसाची हजारो रुपयांची रक्कम शाळेसाठी समर्पित करून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा लोकसहभागातून रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो. यातून गुणवंतांना प्रोत्साहन तर इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. याच अनुषंगाने लोकसहभागातून सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संकल्पना साकारण्यासाठी मदत करण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी केले होते. यानुसार सर्व पालक, दानशूर ग्रामस्थ व तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक आपापल्यापरीने शाळेला मदत करत होत. यात मागे राहतील ते विद्यार्थी कसले? या शाळेची विद्यार्थिनी प्राची शिंदे हिची पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल तिचा लोकसहभागातून पाच हजार रूपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थीनिने पालकांना विनंती करत त्यात एक हजार रुपयांची भर टाकत एकूण सहा हजार रुपये शाळेच्या सभागृहासाठी दिले. प्राजक्ता हनुमंत घोगरे या विद्यार्थीनिची नगर जिल्हा परिषदेमार्फत केरळमधील इस्रो येथील सहलीसाठी निवड झाल्याबद्दल तिला विविध मान्यवरांनी रोख बक्षीस दिले होते. त्यातील तब्बल पाच हजार रूपये तिने शाळेसाठी दिले. जयशंकर दत्तात्रय शिंदे या विद्यार्थ्याने प्रजासत्ताकदिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या उत्कृष्ट अभिनयातून मिळविलेली बक्षिसाची एक हजार ३५० रुपयांची रक्कम सभागृहाच्या निर्मितीसाठी दिली. प्रेमराज शिंदे या विद्यार्थ्याने पालक व नातेवाइकांनी मागील दोन वर्षात खाऊसाठी दिलेली पैसे वाचवून एक हजार रूपये शाळेसाठी दिले. अक्षता शिंदे या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनिनेदेखील एक हजार रूपयांचे योगदान या कामी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. 'एक दिवस वंचितांसाठी' या उपक्रमांतर्गत शाळेतील पहिली ते पाचवीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. त्यातून मिळालेली तीन हजार रूपयांची रक्कम पाथर्डी येथील निराधार व वंचितांसाठी काम करणाऱ्या सेवक फाउंडेशनचे संस्थापक अमोल राठोड यांच्याकडे सुपूर्द केली.
विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
कोणत्याही श्रीमंत कुटुंबाची पार्श्वभूमी नसताना ऐन दुष्काळातही या सामान्य कुटुंबातील गुणवंतांनी मनाची श्रीमंती जोपासली. विद्यार्थ्यांचे सामाजिक भान व शाळेविषयीच्या कृतज्ञतेचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, नान्नज बीटच्या शिक्षण विस्तारअधिकारी जयश्री मुकणे, केंद्र प्रमुख सुनिल बुद्धीवंत, युवा उद्योजक संतोष पवार, रमेश आजबे, गुलाब जांभळे, धोंडपारगावचे सरपंच सुखदेव शिंदे, बळीराम शिंदे, गणेश कुमटकर यांच्यासह पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें